पालघर जिल्ह्यात १५ हजार घरकुलांचे काम अद्याप सुरू नाही...४५०० घरकुलांचा घर प्रवेश... मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत थेट भेटी व गृहप्रवेश

Date: 2025-12-26
news-banner
पालघर जिल्ह्यात १५ हजार घरकुलांचे काम अद्याप सुरू नाही...४५०० घरकुलांचा घर प्रवेश...
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत थेट भेटी व गृहप्रवेश

पालघर, दि. २३ डिसेंबर २०२५ :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी राबविण्यात आलेल्या “घरकुल लाभार्थी संवाद अभियान – टप्पा ३” दरम्यान जिल्ह्यातील तब्बल १५ हजार घरकुल लाभार्थ्यांनी अद्याप बांधकामास सुरुवात न केल्याचे वास्तव समोर आले. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये लाभार्थ्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन घरकुल काम सुरू न होण्यामागील कारणांची नोंद घेण्यात आली.
या अभियानाचा मुख्य उद्देश अपूर्ण व सुरू न झालेल्या घरकुलांची स्थिती जाणून घेऊन अडचणी दूर करणे हा होता. याचबरोबर जिल्ह्यात ४,५०० पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश कार्यक्रम सायंकाळी ४ वाजेपर्यंत यशस्वीपणे पार पडला.
जिल्हास्तरीय कार्यक्रमांतर्गत मोखाडा पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत साखरी येथे आयोजित कार्यक्रमास आमदार हरिश्चंद्र भोये तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी उपस्थिती लावली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निकम, सरपंच, पंचायत समितीचे खाते प्रमुख, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) तसेच प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN) अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांशी थेट संवाद साधत घरकुलाचे काम सुरू न होण्यामागील अडचणी, आर्थिक समस्या, कागदपत्रांची पूर्तता, मजुरी व साहित्य उपलब्धता याबाबत माहिती घेण्यात आली. काम तातडीने सुरू करून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरकुल वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याबाबत लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
मोखाडा येथील कार्यक्रमात पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी घरकुलाचे काम सुरू न केलेल्या लाभार्थ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन विलंब न करता बांधकामास सुरुवात करावी, असे आवाहन केले.
दरम्यान, महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी महिला स्वयंसहायता गट सदस्य, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका व महिला बचत गट सदस्य यांची हिमोग्लोबिन (HB) तपासणी व आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आली. मोखाडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, भाताने येथे हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे व अनिमिया मुक्त गाव ही संकल्पना बळकट करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या संपूर्ण जिल्हास्तरीय अभियानाचे नियोजन व अंमलबजावणी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्या सूचनांनुसार सर्व पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर समन्वयाने काम करून अभियान यशस्वी करण्यात आले.

Leave Your Comments