पालघर जिल्ह्यातील ‘आरोहन’ संस्थेला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार

Date: 2026-03-27
news-banner
**पालघर जिल्ह्यातील ‘आरोहन’ संस्थेला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार**
               आदिवासी भागात आरोग्य व पोषण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ‘आरोहन’ संस्थेला यंदाचा ग्लेनमार्क न्यूट्रिशन पुरस्कार २०२६ (Glenmark Nutrition Award 2026) जाहीर झाला आहे. १४ मार्च २०२६ रोजी दिल्ली येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या वतीने सुजाता आयरकर-दादोडे यांनी हा सन्मान स्वीकारला.

                देशभरातून प्राप्त झालेल्या २०० हून अधिक अर्जांमधून ‘आरोहन’ची निवड करण्यात आली. पालघर जिल्ह्यातील मोखाडा व इतर
आदिवासी भागात कुपोषण निर्मूलनासाठी समन्वित व सर्वसमावेशक पद्धतीने राबवलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पाच लाख रुपयांचे पारितोषिक समाविष्ट आहे.
               ग्लेनमार्क न्यूट्रिशन पुरस्कार हा ग्लेनमार्क फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार असून, भारतात कुपोषणाविरुद्ध प्रभावी, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत पद्धतीने कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी दिला जातो. विशेषतः ० ते ६ वयोगटातील बालके तसेच गर्भवती व स्तनदा माता यांच्या पोषणस्थितीत सुधारणा घडवून आणणाऱ्या उपक्रमांची दखल घेण्यात येते. “ निरोगी बालक, निरोगी जग ” हे या पुरस्काराचे ब्रीद वाक्य आहे.
              २००६ मध्ये मोखाडा येथे कुपोषणामुळे १६९ बालमृत्यू झाल्यानंतर या गंभीर समस्येवर काम करण्यासाठी निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालयाने ‘आरोहन’ हा क्षेत्रीय कृती प्रकल्प सुरू केला. त्यानंतर संस्थेने आरोग्य, पोषण, पाणी व्यवस्थापन ,शेती, शिक्षण आणि उपजीविक या विविध क्षेत्रांचा समन्वय साधत काम सुरू ठेवले आहे.

             संस्थेच्या कार्यपद्धतीत शासनाच्या यंत्रणांशी समन्वय साधून उपलब्ध सेवांचे बळकटीकरण करणे आणि स्थानिक समुदायाचे सक्षमीकरण करण्यावर विशेष भर दिला जातो. समुदाय स्वतःच्या हक्कांसाठी सक्षमपणे उभा राहावा, हा संस्थेचा दीर्घकालीन उद्देश आहे.

आदिवासी भागातील दुर्गम भौगोलिक परिस्थिती, मर्यादित आरोग्य सुविधा, शिक्षणाच्या अपुऱ्या संधी आणि कुपोषणाच्या समस्येवर ‘आरोहन’ने सातत्याने काम करत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे.
या पुरस्काराबद्दल संस्थेने ग्लेनमार्क फाउंडेशनचे आभार मानले असून, हा सन्मान संस्थेसोबत कार्य करणाऱ्या महिलांचा, बालकांचा आणि संपूर्ण आदिवासी समुदायाचा असल्याची भावना व्यक्त केली आहे.

Leave Your Comments