दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वारली कलेला नवी ओळख जिल्हा परिषदेत प्रेरणादायी प्रदर्शन

Date: 2026-03-27
news-banner
**दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वारली कलेला नवी ओळख;
 जिल्हा परिषदेत प्रेरणादायी प्रदर्शन**

               दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना स्वावलंबनाकडे प्रेरित करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद पालघरने राबविलेल्या उपक्रमांतर्गत वारली कलेचे आकर्षक प्रदर्शन आज जिल्हा परिषदेत भरविण्यात आले. या प्रदर्शनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेची प्रभावी झलक सादर केली.

                जिल्हा परिषदेमार्फत सात दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांना ३९ दिवसांचे विशेष वारली पेंटिंग प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या कौशल्यांच्या आधारे साकारलेल्या विविध कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण जीवन, निसर्ग आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या कलाकृतींनी सर्वांची मने जिंकली.
प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यांनी प्रदर्शनाची पाहणी करत विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याचे कौतुक केले. साध्या माध्यमांतून उभ्या केलेल्या या कलाकृतींमध्ये सखोल निरीक्षणशक्ती आणि सर्जनशीलता दिसून येते, असे त्यांनी नमूद केले.

                 या प्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद (सामान्य प्रशासन), उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील (पंचायत), कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी तसेच अनिता शिंदे उपस्थित होत्या.

               या उपक्रमात निलेश मुर्डेश्वर कर्णबधिर विद्यालय (जव्हार), शापरिया कर्णबधिर विद्यालय (पालघर), स्वामी परिज्ञानाश्रम कर्णबधिर विद्यालय व मतिमंद शाळा (विरार), जीवदानी मतिमंद शाळा (वसई) तसेच मूकबधिर बालविकास केंद्र (डहाणू) अशा सात शाळांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणादरम्यान वारली कलेचे बारकावे आत्मसात करत विविध कलाकृती तयार केल्या.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा दिव्यांग कल्याण अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर यांच्या नियोजनातून हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. प्रदर्शनातील वस्तूंना अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले.
                   कार्यक्रमादरम्यान सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ‘दिशा’ अभियानांतर्गत अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या मतिमंद शाळांचाही सन्मान करण्यात आला. तसेच प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

                लतिका भाकरे, मेघा जाधव, सुरेश चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. हा उपक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ घडवून आणणारा ठरला असून त्यांच्या कलागुणांना दिशा देत स्वावलंबनाकडे वाटचाल घडविणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave Your Comments