आरोग्यसंपन्न पालघरचा संकल्प; ग्रामपातळीवरून उभारणार आरोग्याची चळवळ

Date: 2026-04-27
news-banner
**आरोग्यसंपन्न पालघरचा संकल्प; ग्रामपातळीवरून उभारणार आरोग्याची चळवळ**

     “आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ ही केवळ योजना नसून प्रत्येक ग्रामस्थाच्या जीवनाशी निगडित चळवळ आहे. सरपंच, ग्रामसेवक आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न केल्यास आरोग्यसंपन्न पालघर जिल्ह्याचे स्वप्न निश्चितच साकार होईल,” असा विश्वास जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी व्यक्त केला.
           जिल्हा परिषद पालघरच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा त्यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह ग्रामपातळीवरील प्रतिनिधींचा सक्रिय सहभाग दिसून आला.
             रानडे पुढे म्हणाले की, हे अभियान केवळ शासनापुरते मर्यादित नसून लोकसहभागातूनच यशस्वी होणार आहे. प्रत्येक गावाने स्वतःची जबाबदारी ओळखून स्वच्छता, पोषण, मातृ-शिशु आरोग्य, संसर्गजन्य आजार नियंत्रण यांसारख्या घटकांवर लक्ष केंद्रित केले, तर संपूर्ण जिल्हा आरोग्यदृष्ट्या सक्षम होईल.
              या अभियानाचा कालावधी १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ असा असून, गावांच्या कामगिरीचे ठोस निकषांवर मूल्यांकन करण्यात येणार आहे. ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या गावांना ‘आरोग्यसंपन्न गाव’ म्हणून घोषित केले जाणार आहे. तसेच राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांना ५ कोटी, ३ कोटी व २ कोटी रुपयांची पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार असल्याने ग्रामपंचायतींना मोठी प्रेरणा मिळणार आहे.
             कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी प्रास्ताविकातून अभियानाची उद्दिष्टे व कार्यपद्धती स्पष्ट करताना, माता मृत्यू व बालमृत्यू दर कमी करणे, आरोग्याबाबत जनजागृती वाढविणे आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणे ही प्रमुख उद्दिष्टे असल्याचे सांगितले. “गावातील प्रत्येक नागरिक जागरूक झाला तरच खऱ्या अर्थाने आरोग्यसंपन्न गाव निर्माण होईल,” असे त्यांनी नमूद केले.
               जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करत, “प्रत्येक रुग्णाला वेळेत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे,” असे स्पष्ट केले. तर जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) व्यंकटराव हुंडेकर यांनी महिला व बालविकास विभागाचा सक्रिय सहभाग राहणार असल्याचे सांगत, सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास अभियान अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
                 या कार्यशाळेत प्रत्येक तालुक्यातील ५ सरपंच, २ आशा स्वयंसेविका, २ समुदाय आरोग्य अधिकारी, २ ग्रामसेवक, गट विस्तार अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक सहभागी झाले होते. उपस्थित सरपंच व आशा स्वयंसेविकांनीही मनोगत व्यक्त करत गावपातळीवर अभियान राबविण्यासाठी सक्रिय सहभागाची तयारी दर्शविली.
          कार्यशाळेतून एक स्पष्ट संदेश देण्यात आला—
“स्वच्छता, जागरूकता आणि सामूहिक प्रयत्न यांमधूनच आरोग्यसंपन्न गावाची निर्मिती शक्य आहे.”

Leave Your Comments