वेवूर अंगणवाडीला राज्य अन्न आयोगाची भेट; बालकांच्या पोषण व अन्न सुरक्षा योजनांचा आढावा

Date: 2026-05-27
news-banner
महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे, रणजीत निंबाळकर आणि सदस्यांनी २० मे रोजी पालघर तालुक्यातील वेवूर, दस्तुरीपाडा येथील अंगणवाडी केंद्राला भेट देत तेथील बालकांचे पोषण, आरोग्य आणि अन्न सुरक्षा योजनांची पाहणी केली. अंगणवाडीत राबविण्यात येणारे उपक्रम, लाभार्थ्यांना दिला जाणारा पूरक आहार तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या योजनांची माहिती त्यांनी घेतली.

             यावेळी ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या वजन व उंची मोजणी नोंदींची तपासणी करण्यात आली. कुपोषण प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजना, वाढ चार्ट नोंदी, नियमित आरोग्य तपासणी आणि पोषण ट्रॅकिंग प्रणालीची माहिती अधिकाऱ्यांनी जाणून घेतली. बालकांच्या पोषण स्थितीत अधिक सुधारणा व्हावी यासाठी संतुलित आहार, स्वच्छता आणि पालकांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

         भेटीदरम्यान गर्भवती माता, स्तनदा माता आणि पालकांशी संवाद साधून अंगणवाडीमार्फत मिळणारा पूरक आहार, पोषण अभियान, आरोग्य सेवा, लसीकरण तसेच “पोषण भी, पढाई भी” उपक्रमाबाबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. बालकांची नियमित उपस्थिती, घरातील आहार पद्धती, स्वच्छतेच्या सवयी आणि आरोग्याबाबतची जागरूकता यावरही चर्चा करण्यात आली.

               अधिकाऱ्यांनी गावातील रेशन कार्डधारक नागरिकांशी संवाद साधत सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत मिळणाऱ्या धान्याचा दर्जा, वितरणाची नियमितता तसेच नागरिकांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. काही नागरिकांनी रेशन वितरणातील तांत्रिक अडचणी, नाव समाविष्ट करणे, ई-केवायसी प्रक्रिया आणि धान्य वितरणाच्या वेळांबाबत समस्या मांडल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्यांची नोंद घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

         अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि ग्रामस्थांच्या कामाचे कौतुक करत बालकांचे पोषण आणि आरोग्य सुधारण्यासाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

           या भेटीवेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विवेक चौधरी, बाल विकास प्रकल्प अधिकारी (वसई-विरार पूर्व) गणेश मान्टे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार, तुषार धुमाळ, मुख्य सेविका तृप्ती भोये, कल्पना आघाव, अंगणवाडी मदतनीस, माता-पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave Your Comments