अनुसूचित जमाती (आदिवासी) प्रवर्गातील महिलांसाठी सैन्य-पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची संधी

Date: 2026-03-27
news-banner
**अनुसूचित जमाती (आदिवासी) प्रवर्गातील महिलांसाठी सैन्य-पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची संधी**

                    आदिवासी विकास विभागातर्फे २०२६-२७ या वर्षासाठी अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातील महिलांसाठी सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार यांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण पळसुंडे (ता. मोखाडा) येथे आयोजित करण्यात येत असून, ग्रामीण व दुर्गम भागातील इच्छुक युवतींसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून प्रत्यक्ष शारीरिक चाचणीद्वारे सुरू होणार आहे. त्याच दिवशी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार असून, अंतिम निवड यादी २ एप्रिल २०२६ रोजी जाहीर केली जाणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण केंद्रात भोजनाची व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षणास सुरुवात होणार असून, त्याबाबत संबंधित महिलांना स्वतंत्ररीत्या कळविण्यात येणार आहे.

*पात्रता निकष* :
या प्रशिक्षणासाठी किमान १५० सें.मी. उंची, किमान ४५ किलो वजन, वय १८ ते २६ वर्षे आणि किमान बारावी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. तसेच उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.

*आवश्यक कागदपत्रे* :
निवड प्रक्रियेसाठी येताना शाळा सोडल्याचा दाखला, बारावीचे गुणपत्रक, जातीचा दाखला, डोमिसाईल प्रमाणपत्र, आधार कार्डची प्रत तसेच नाव नोंदणी प्रमाणपत्र अशी सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
दरम्यान, या निवड प्रक्रियेसाठी येण्या-जाण्याचा किंवा राहण्याचा कोणताही भत्ता देण्यात येणार नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सैन्य व पोलीस दलात करिअर घडवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी हे प्रशिक्षण मार्गदर्शक ठरणार असून, त्यातून त्यांना स्पर्धात्मक भरती प्रक्रियेसाठी सक्षम बनविण्याचा उद्देश आहे.

*अधिक माहितीसाठी* ७३५०३४६०६६ किंवा ८८३०९९३६८८ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave Your Comments