राष्ट्रीय हस्तलिखित वारशाच्या जतनासाठी ‘ज्ञानभारत’ सर्वेक्षण मोहीम सुरू; मोबाईल अॅपद्वारे नोंदणीची सुविधा

Date: 2026-04-27
news-banner
**राष्ट्रीय हस्तलिखित वारशाच्या जतनासाठी ‘ज्ञानभारत’ सर्वेक्षण मोहीम सुरू; मोबाईल अॅपद्वारे नोंदणीची सुविधा**

            भारतातील समृद्ध हस्तलिखित वारशाचे संवर्धन, दस्तऐवजीकरण आणि डिजिटायझेशन करण्यासाठी केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने ‘ज्ञानभारत (Gyan Bharatam)’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. १६ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेद्वारे देशभर विखुरलेल्या हस्तलिखितांचा शोध, नोंदणी व जतन करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी ‘Gyan Bharatam’ या मोबाईल अॅपची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर झालेल्या या उपक्रमांतर्गत देशातील शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, ग्रंथालये, धार्मिक संस्था तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह (National Digital Repository) तयार करून त्याचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसारण करण्याचा हेतू आहे. हस्तलिखितांची मालकी संबंधित संस्था किंवा संग्राहकांकडेच राहणार असून आवश्यकतेनुसार त्यांचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे ही क्लस्टर केंद्रे म्हणून कार्यरत राहणार आहेत. तसेच आनंद आश्रम, पुणे आणि भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे ही स्वतंत्र केंद्रे म्हणून काम पाहतील. राज्यासाठी पुस्तकालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची नोडल संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली असून संचालक मुजिवकुमार जंगले हे राज्य नोडल अधिकारी आहेत. तर अंजली सोमक, उपसंचालक, मराठी भाषा विकास संस्था या सहनोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

या सर्वेक्षण मोहिमेसाठी विकसित करण्यात आलेले ‘Gyan Bharatam’ मोबाईल अॅप Android व iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या अॅपद्वारे हस्तलिखितांची नोंदणी, क्षेत्रीय मूल्यांकन, पडताळणी आणि दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. तसेच www.gyanbharatam.com⁠� या संकेतस्थळावरून सविस्तर माहिती व ‘यूजर मॅन्युअल’ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

जिल्हास्तरावर जिल्हा नोडल अधिकारी नियुक्त करणे, समित्या स्थापन करणे तसेच मंदिरे, मठ, धार्मिक संस्था, विद्यापीठे, ग्रंथालये, शैक्षणिक संस्था आणि खाजगी संग्राहक यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या उपक्रमात शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, संग्रहालये, संस्कृत पाठशाळा, संशोधक, पारंपरिक पंडित तसेच एन सी सी, एन एस एस स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्याकडे कोणतीही हस्तलिखिते उपलब्ध असल्यास त्यांची माहिती ‘Gyan Bharatam’ मोबाईल अॅपवर अपलोड करून या राष्ट्रीय उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन अपर आयुक्त (सामान्य प्रशासन), कोकण विभाग, नवी मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave Your Comments