स्वत:च्या निवेदनातून प्रशासनाचीच पोलखोल; ९५% पूर्ण म्हणत वर्षभरानंतरही काम अपुरेच

Date: 2026-06-27
news-banner
नवयुग पालघर विशेष

स्वत:च्या निवेदनातून प्रशासनाचीच पोलखोल; ९५% पूर्ण म्हणत वर्षभरानंतरही काम अपुरेच

१५ जून २०२५ रोजी प्रसिद्धी साठी दिलेली ही बातमी : ट्रॉमा केअर सेंटर चे काम प्रगतीपथावर ९५% काम पूर्ण

         पालघर जिल्हयातील मनोर येथील अतिमहत्वाचे असलेले ट्रॉमा केअर सेंटरचे काम प्रगतीपथावर असून सदर ट्रॉमा केअर सेंटरचे काम ९५% पुर्ण करण्यात आलेले आहे. उर्वरीत काम लवकरात लवकर पुर्ण होण्याच्या दुष्टीकोनातून व यासाठी आवश्यक तो निधी तात्काळ उपलब्ध होण्यासाठी पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. यासाठी त्यांनी शासनाचे आरोग्य सचिव श्री. विरेंद्र सिंग, सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई यांना याबाबतीत दिनांक २६/०५/२०२५ रोजी पत्राव्दारे विनंती केलेली आहे.
 तसेच नंडोरे ता. पालघर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या निधीबाबत जिल्हा प्रशासनामार्फत पाठपूरावा करण्यात येत असून मनोर येथील ट्रॉम केअर व नंडोरे पालघर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी लवकरच उर्वरित निधी लवकरच प्राप्त होवून सदरची रुग्णालये रुग्णांच्या सेवेसाठी लवकरच उपलब्ध होतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केला आहे.


जून २०२५ मध्ये प्रशासनाने ९५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला होता


जून २०२६ मधील अधिकृत पाहणीत अजूनही कामे अपूर्ण असून ही कामे जून जुलै अखेर पर्यंत पूर्ण होण्याचा दावा


वर्षभरानंतरही फारसा फरक नाही त्यामुळे प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे


 १८ जून २०२६ रोजी प्रसिध्दीसाठी दिलेली बातमी :जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा सेंटरच्या कामांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून पाहणी

          पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आज पालघर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालय तसेच मनोर येथील ट्रॉमा सेंटरला भेट देऊन कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णालय व ट्रॉमा सेंटरच्या इमारतींची बांधकामे पूर्णत्वाच्या टप्प्यात असताना वीज, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांच्या कामांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
          यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी, अभियंते तसेच ठेकेदार उपस्थित होते. रानडे यांनी विविध कामांची माहिती घेत प्रलंबित कामे निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीशी संबंधित उर्वरित बांधकामे जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे तसेच वीज, पाणीपुरवठा, वैद्यकीय साहित्य उपलब्धता, मनुष्यबळ नियुक्ती आणि इतर पूरक कामे जुलैअखेरपर्यंत पूर्ण करण्याबाबत निश्चित नियोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
         पाहणीदरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा सेंटर कार्यान्वित
 झाल्यानंतर पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. विशेषत: अपघातग्रस्त व गंभीर रुग्णांसाठी तातडीच्या उपचारांची सुविधा जिल्ह्यातच उपलब्ध होणार असल्याने आरोग्य सेवेला बळकटी मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्पाशी संबंधित सर्व कामे वेळेत पूर्ण करून रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक निर्देश दिले आहेत.

Leave Your Comments