ऑक्टोबर अखेरही पावसाचा धुमाकूळ – शेतकऱ्यांवर संकटाचा डोंगर ! पालघर जिल्ह्यात भातपिकाचे प्रचंड नुकसान; हातातोंडाशी आलेले पीक गेले

Date: 2025-10-27
news-banner
नवयुग पालघर Navyug Palghar Weekly

ऑक्टोबर अखेरही पावसाचा धुमाकूळ – शेतकऱ्यांवर संकटाचा डोंगर !
पालघर जिल्ह्यात भातपिकाचे प्रचंड नुकसान; हातातोंडाशी आलेले पीक गेले

पालघर | प्रतिनिधी

ऑक्टोबर महिना संपत आला असतानाही पावसाने विश्रांती घेतलेली नाही. सततच्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील संकट अधिकच गडद झाले आहे. आता तर बहुतांश शेतकरी अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडले असून हातातोंडाशी आलेले भातपीक पाण्याखाली गेले आहे.

गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने कापणीस तयार असलेले पीक शेतातच कोसळले असून अनेक ठिकाणी पीक पाण्यात गाडले गेले आहे. काही भागांत तर पावसाच्या पाण्याने खाचरेच पूर्ण भरून राहिल्याने, शेतकऱ्यांचे सर्व श्रम व खर्च वाया गेले आहेत. हातात येणारं पीक आता हातातून निसटल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हताशेचे सावट पसरले आहे.

जिल्ह्यातील बहुतांश शेतात पाणी साचले आहे, तर हवामान खात्याने येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत आणखी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील आशा पूर्णपणे मावळल्या आहेत.

यावर्षी पावसाळा तब्बल सहा महिने टिकून राहिल्याने हा विक्रमी पावसाळा ठरला आहे. जूनपूर्वीच पावसाची सुरुवात झाली आणि ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस सुरू असल्याने गेल्या अनेक वर्षांतील हा सर्वाधिक प्रदीर्घ पावसाळा ठरला आहे.

अनेक शेतकरी सांगतात, “अशा प्रकारचा ऑक्टोबर अखेरपर्यंत टिकून राहिलेला पाऊस आयुष्यात पहिल्यांदाच पाहतो आहोत. पीक हातात आले होते, पण पावसाने सगळं वाहून नेलं.”

सध्या जिल्ह्यातील शेतीक्षेत्रात पाण्याचे साम्राज्य असून नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सरकारने तात्काळ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान यापूर्वीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले असून, शेतकरी नुकसान भरपाई तातडीने मिळावी अशी मागणी करत आहेत

Leave Your Comments