प्रतीक्षेतील १५ डब्यांची लोकल रुळांवर येण्याच्या प्रतीक्षेत.

Date: 2025-10-28
news-banner
🚆 १५ डब्यांची डहाणू लोकल : प्रतीक्षेचा शेवट अजूनही अधांतरी...!

https://youtu.be/IcKc9P0B16Y?si=qKGR2lQsfAwSLuLV

प्लॅटफॉर्म वाढीचं काम सुरू — पण प्रवाशांना अद्याप ‘त्या’ दिवसाचीच वाट

पालघर :
डहाणूकर प्रवाशांसाठी १५ डब्यांच्या लोकलची आस मागील अनेक वर्षांपासून कायम आहे. पश्चिम रेल्वेवर नोव्हेंबर २००९ मध्ये विरार-दादर दरम्यान १५ डब्यांची पहिली लोकल धावू लागल्यानंतर तब्बल १६ वर्षांनंतरही ही सुविधा डहाणूपर्यंत पोहोचलेली नाही.

सुरुवातीच्या काळात या १५ डब्यांच्या लोकल्स फक्त मोठ्या स्थानकांत थांबत असत. त्यानंतर नालासोपारा, नायगाव, मीरा रोड, दहिसर आदी स्थानकांवर थांबे मिळाले, पण प्लॅटफॉर्म लहान असल्याने दोनदा थांबण्याची वेळ यायची. जानेवारी २०११ पासून ही लोकल चर्चगेटपर्यंत धावू लागली, मात्र ती विरारपुरतीच मर्यादित राहिली.

रेल्वे प्रशासनाच्या मते, डहाणू मार्गावरील सफाळे, उमरोळी व डहाणू स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची लांबी अपुरी असल्याने १५ डब्यांच्या लोकल धावण्यास अडथळा निर्माण झाला होता. आता या समस्येवर काही प्रमाणात उपाययोजना सुरू आहेत. सफाळे स्थानकातील प्लॅटफॉर्म लांबीवाढीचे काम पूर्ण झाले असून उमरोळी येथे काम प्रगतीपथावर आहे. डहाणू स्थानकातही लवकरच हे काम सुरू होणार आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व खासदार डॉ. हेमंत सावरें यांच्या पुढाकारामुळे या कामांना गती मिळत असली तरी प्रत्यक्ष लोकल केव्हा धावणार याबाबत अद्याप निश्चित वेळापत्रक जाहीर झालेले नाही.

डहाणू स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १, २ आणि ३ हे १५ डब्यांची लोकल सामावून घेण्यास सक्षम असल्याचे सांगितले जात असले तरी, नियमित सेवा सुरू होईपर्यंत प्रवाशांची प्रतीक्षा कायम राहणार आहे.

डहाणूपर्यंत १५ डब्यांची लोकल धावल्यास विरार ते चर्चगेट मार्गावरील गर्दीचा मोठा भार हलका होईल, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे. मात्र, सध्या तरी ही ‘प्रतीक्षेची लोकल’ अजून ट्रॅकवर उतरायची बाकी आहे.

— ✍️ माहिती स्रोत : दयानंद पाटील, मायखोप (केळवे रोड)

Leave Your Comments