नवयुग पालघर
**स्वाधार शिष्यवृत्तीसाठी शासकीय वसतिगृहातील प्रवेश अर्ज बंधनकारक; अन्यथा दोन्ही योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता**
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी आता प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वसतिगृहासाठी अर्ज न करणारे विद्यार्थी स्वाधार शिष्यवृत्ती तसेच शासकीय वसतिगृह या दोन्ही योजनांच्या लाभापासून वंचित राहू शकतात, असा महत्त्वाचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला असून याचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी याची दखल घ्यावी असे आवाहन केले आहे.
चालू २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून या नियमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. गुणवत्तेनुसार किंवा जागेअभावी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, त्यांनाच स्वाधार योजनेसाठी पात्र मानले जाणार आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे अत्यावश्यक ठरले आहे.
ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नाही, तेथे या नियमात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असली तरी भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मागील परीक्षेत किमान ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
शालेय अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ असून, इयत्ता ११ वी, १२ वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी १५ जुलै २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.