महावितरणला शिवसेनेचा इशारा; संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविणार नसल्याचे आश्वासन

Date: 2026-06-29
news-banner
**महावितरणला शिवसेनेचा इशारा; संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविणार नसल्याचे आश्वासन**

             जिल्ह्यात ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या कथित सक्तीविरोधात शिवसेनेच्या वतीने सोमवारी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनानंतर महावितरण प्रशासनाने ग्राहकांवर कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत वीजग्राहकांना आश्वस्त केल्याचे म्हटले आहे.
               या मोर्चामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती मेहर, सहसंपर्कप्रमुख केदार काळे, जिल्हा संघटिका वैदेही वाढाण, पालघर नगराध्यक्ष उत्तम घरत, डहाणू नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी, माजी आमदार अमित घोडा यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.
              शिवसेनेने अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात ग्राहकांची पूर्वसंमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. ग्रामीण व आदिवासीबहुल भागांमध्ये यामुळे वाढीव वीजबिले, प्रीपेड प्रणालीची शक्यता, तांत्रिक अडचणी आणि आर्थिक भार वाढण्याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय घरगुती, व्यावसायिक किंवा कृषी वीज ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, स्मार्ट मीटरबाबत महावितरणची अधिकृत भूमिका लेखी स्वरूपात जाहीर करावी, तसेच नागरिक व लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
              तसेच ग्राहकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पडेस्क स्थापन करण्याचीही मागणी करण्यात आली. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.

Leave Your Comments