https://youtu.be/voLLjoAhToc?si=1ImSl148Z3jBnO56
📰 सेवेचा प्रवास, कार्याची दखल — महेंद्र किणी यांना २०२५ मध्ये राज्य पातळीवरील उत्कृष्ट कार्यकारी अभियंता पुरस्कार
अभियंता दिनानिमित्त २०२४–२५ साठी वैयक्तिक पुरस्कार जाहीर
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कार्यकारी अभियंते महेंद्र पांडुरंग किणी, सतीश रामराव पुरी आणि वर्षा सचिन घुशे या तिघांचा २०२४–२५ या कालावधीकरिता राज्य शासनातर्फे वैयक्तिक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनी, १५ सप्टेंबरला साजऱ्या होणाऱ्या अभियंता दिनानिमित्त या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून तिघाही कार्यकारी अभियंत्यांना तांत्रिक संवर्ग (स्थापत्य) वर्गातून
विभागून राज्य पातळीवरील हा पुरस्कार घोषित झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यभरात रस्ते, पूल, शासकीय इमारती व इतर सार्वजनिक सुविधा उभारणीची कामे केली जातात. पुलं-इमारतींची संकल्पना तयार करणे, संगणकाच्या साहाय्याने संकल्पनाचित्रे बनवणे, सार्वजनिक इमारतींमध्ये अचूक विद्युतीकरण करणे आणि प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करताना अभियंत्यांचे तांत्रिक व प्रशासकीय कौशल्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून दरवर्षी अभियंता दिनानिमित्त वैयक्तिक पुरस्कार दिले जातात.
या वर्षी गौरवासाठी तांत्रिक संवर्ग (स्थापत्य) यामधून राज्यातून निवड झालेल्या तिन्ही कार्यकारी अभियंत्यांची कामगिरी विभागाच्या गुणवत्तावृद्धीत महत्त्वपूर्ण ठरली आहे.यासाठी तिघांनाही विभागून हा पुरस्कार घोषित झाला आहे. त्यांच्या योगदानामुळे विभागाच्या प्रकल्पांना गती मिळाली असून भविष्यातही त्यांच्या कार्याचा समाजाला लाभ होईल, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे.
किणी यांना घोषित झालेला राज्य पातळीवरील हा पुरस्कार केवळ त्यांच्या कामगिरीचा गौरव नसून, गेल्या वीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून उभ्या राहिलेल्या तांत्रिक कौशल्य, प्रामाणिक कार्यपद्धती आणि सामाजिक बांधिलकीचा सन्मान आहे.
📚 शैक्षणिक प्रवास व पार्श्वभूमी
महेंद्र पांडुरंग किणी यांचा जन्म १५ सप्टेंबर १९७४ रोजी झाला. त्यांचे मूळ गाव पालघर जिल्ह्यातील तिघरे (आगरवाडी) आहे.
शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी सातत्याने उत्कृष्ट यश संपादन केले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून M.E. (Structures) ही पदवी First Class with Distinction या गुणवत्तेसह मिळवली. त्याआधी B.E. (Civil Engineering) ही पदवी त्यांनी मुंबई विद्यापीठातून First Class with Honours श्रेणीत प्राप्त केली. तसेच, D.C.E. (Diploma in Civil Engineering) पदविका महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण मंडळामार्फत यशस्वीरित्या पूर्ण केली.
मजबूत तांत्रिक पायाभूत शिक्षण, काटेकोर कामाची पद्धत आणि नियोजनशक्ती यामुळे त्यांच्या अभियंता कारकिर्दीला भक्कम पाया लाभला.
🏛 शासकीय सेवेतील दोन दशकांचा समृद्ध प्रवास
महेंद्र किणी यांनी मार्च १९९८ मध्ये ‘मे. श्रीखंडे कन्सल्टंट प्रा. लि.’ येथे डिझाईन कन्सल्टंट म्हणून व्यावसायिक कारकीर्दीला प्रारंभ केला. त्यानंतर सप्टेंबर २००० मध्ये ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक अभियंता (श्रेणी–२) पदावर पालघर व वसई येथे नियुक्त झाले आणि शासकीय सेवेत प्रवेश केला.
डिसेंबर २०१५ ते जुलै २०१८ दरम्यान त्यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, खामगाव, बुलढाणा येथे उपविभागीय अभियंता म्हणून काम करताना २२० किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचे नवीन बांधकाम सुरु केले.
जुलै २०१८ ते ऑगस्ट २०२१ दरम्यान ते पालघर येथे उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते, तर ऑगस्ट २०२१ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत त्यांनी तलासरी येथे जबाबदारी सांभाळली.
यानंतर ऑगस्ट २०२३ ते जून २०२५ या काळात ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. जून २०२५ पासून ते आजपर्यंत, ते पालघर येथे कार्यकारी अभियंता म्हणून महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नेतृत्व करत आहेत.
🏅 व्यावसायिक संस्थांचे सदस्यत्व व पुरस्कार
किणी हे Indian Concrete Institute (ICI) आणि Indian Institution of Bridge Engineers (IIBE) या प्रतिष्ठित व्यावसायिक संस्थांचे सक्रिय सदस्य आहेत.
त्यांना २०१९ मध्ये हरित इमारत संकल्पनेसाठी GRIHA Council कडून Rising Star Award प्राप्त झाला, जो मा. ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.
सार्वजनिक बांधकाम मंडळ उत्कृष्ट अभियंता पुरस्कार त्यांना तीन वेळा मिळाला आहे — २००८–०९, २०१२–१३ आणि २०२०–२१.
२०१९ मध्ये त्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून विशेष प्रशस्तीपत्र देण्यात आले, तर २०२२–२३ साली ते महाराष्ट्र शासन गुणवंत अभियंता पुरस्कारासाठी नामांकित झाले होते.
🏗 महत्त्वपूर्ण प्रकल्पांतील योगदान :
त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत.
पुतळे व पर्यटन प्रकल्पांत, मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ८३ फूट उंच ब्रॉन्झ पुतळा उभारणीचे काम पूर्ण केले.
कोकण विभागात, सावंतवाडी व कुडाळ रेल्वे स्थानक परिसरातील प्रवासी सुविधा व सुशोभीकरण, वेंगुर्ला शासकीय विश्रामगृह, आंबोली व कुडाळ येथील शासकीय विश्रामगृहांची कामे ही उल्लेखनीय ठरली.
पालघर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये हायब्रीड अॅन्युटी योजनेअंतर्गत पाच प्रमुख रस्ते, डहाणू (घोलवड व बोर्डी) आणि पालघर रेल्वे फाटकांवरील उड्डाणपूल, माकुणसार खाडीवरील पुलाचे मजबुतीकरण, केळवे-दांडाखाडीवरील २४० मीटर पूल, माहीम व महिकावती खाडीवरील पूल आणि नाबार्ड योजनेतर्गत ग्रामीण पुलांची उभारणी यांचा समावेश आहे.
शासकीय इमारती व नागरी सुविधा प्रकल्पांत, पालघर व वेंगुर्ला येथील शासकीय विश्रामगृहांचे नूतनीकरण, पालघर ग्रामीण रुग्णालय (३० खाटांचे), मनोर रुग्णालय, जलदगती न्यायालय, मागासवर्गीय वसतिगृहे, वैद्यकीय अधिकारी व न्यायाधीश निवासस्थान, तहसील कार्यालयांचे आधुनिकीकरण आणि “वारली हाट” या वारली कला संस्कृती दालन प्रकल्पांची अंमलबजावणी त्यांनी केली.
📝 विशेष तांत्रिक प्राविण्य व वारसा
किणी यांना आरसीसी संकल्पना व डिझाईन मध्ये विशेष प्राविण्य आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळात त्यांनी राज्याच्या विविध भागांत अभियंता म्हणून कार्य करताना रस्ते, पूल, शासकीय इमारती, सांस्कृतिक केंद्रे, आरोग्य सुविधा आणि न्यायव्यवस्था पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.
त्यांच्या या दीर्घ, बहुआयामी आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम कारकिर्दीची योग्य दखल घेत राज्य शासनाने २०२४–२५ या वर्षासाठी त्यांना राज्यातील दोन अन्य कार्यकारी अभियंत्यांसह अभियंता दिनी वैयक्तिक पुरस्कार जाहीर झाला आहे.