मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राज्यस्तरीय गृहनिर्माण अधिकाऱ्यांची पालघर जिल्ह्याला भेट ३१ डिसेंबरपर्यंत सर्व घरकुले पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश

Date: 2025-11-03
news-banner
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राज्यस्तरीय गृहनिर्माण अधिकाऱ्यांची पालघर जिल्ह्याला भेट
३१ डिसेंबरपर्यंत सर्व घरकुले पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश

पालघर, (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५–२६ अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माण विभागाच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी पालघर जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा दौरा करून प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि PM–JANMAN योजनांच्या प्रगतीचा सखोल आढावा घेतला. जिल्ह्यातील सर्व मंजूर घरकुले ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले.

राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयामार्फत डहाणू, वाडा आणि पालघर या तीन तालुक्यांमध्ये स्वतंत्र टीमद्वारे ३० जून रोजी क्षेत्रीय पाहणी करण्यात आली.
डॉ. राजाराम दिघे (संचालक), डॉ. माणिक दिवे (अपर आयुक्त, विकास कोंकण विभाग), डॉ. संघारत्न सोनावणे (MIS) आणि शरद पवार (विभाग प्रोग्रामर) यांनी डहाणू तालुक्यातील कासा आणि गंजाड ग्रामपंचायतींना भेट देऊन प्रधानमंत्री जनमन आवास योजनेंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांची तसेच रोजगार मस्टरची पाहणी केली.

दरम्यान, राजलक्ष्मी येरपुडे (उपसंचालक) आणि परमेश्वर शेलार (राज्य वस्तूविशारद) यांनी वाडा तालुक्यातील नेहरोळी ग्रामपंचायतीतील PM–JANMAN वसाहतीची पाहणी केली. तर डॉ. सचिन पांझडे (उपसंचालक) आणि दिनेश मोवाळे (IEC) यांनी पालघर तालुक्यातील दुर्वेस व नांदगाव तर्फे मनोर येथील घरकुलांची पाहणी केली. या सर्व पाहणीदरम्यान प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते तसेच घरकुल व मनरेगा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

यानंतर जिल्हा परिषद, पालघर येथील जननायक बिरसा मुंडा सभागृहात ग्रामीण गृहनिर्माण आणि मनरेगा विभागाच्या संयुक्त आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे (भा.प्र.से) यांच्या उपस्थितीत अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांची प्रगती तपासण्यात आली.

बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि PM–JANMAN योजनेंतर्गत सर्वाधिक घरकुले पूर्ण करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचा राज्य संचालक डॉ. राजाराम दिघे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच घरकुल मंजुरी व प्रथम हप्ता वितरणात राज्यात पालघर जिल्हा प्रथम क्रमांकावर असल्याबद्दल संपूर्ण घरकुल टीमचे अभिनंदन करण्यात आले.

बैठकीत अधिकाऱ्यांना ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी सर्व मंजूर आणि अपूर्ण घरकुले पूर्ण करण्याचे, भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे, सर्व लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत लाभ देण्याचे तसेच प्रधानमंत्री सूर्यघर योजना किंवा अन्य संबंधित योजनांद्वारे घरकुलांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याची प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश देण्यात आले.

या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील, जिल्हा कार्यक्रम समन्वयक अतुल पारसकर, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), ग्रामीण गृहनिर्माण अभियंते, मनरेगा सहाय्यक प्रकल्प अधिकारी (APO) आणि घरकुल व नरेगा डाटा एन्ट्री ऑपरेटर उपस्थित होते.

बैठकीत प्रलंबित मस्टर पूर्ण करणे, सौर प्रकल्प स्थापनेची प्रक्रिया वेगवान करणे आणि सर्व प्रलंबित घरकुलांची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

Leave Your Comments