जबरी चोरीचे दोन गुन्हे उघड — सोन्याचे दागिने व मोटारसायकल जप्त करण्यात पालघर पोलिसांना यश

Date: 2025-10-03
news-banner
जबरी चोरीचे दोन गुन्हे उघड — सोन्याचे दागिने व मोटारसायकल जप्त करण्यात पालघर पोलिसांना यश

     पालघर पोलिसांनी जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणत तब्बल ₹४.५८ लाखांचा ऐवज जप्त करण्यात मोठे यश मिळवले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व डहाणू पोलिस ठाण्याच्या पथकांनी ही कारवाई केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

        २६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री डहाणू आगर येथील कॉटेज हॉस्पिटलजवळील चहा-वडापाव कँटीनमध्ये ६५ वर्षीय श्रीमती धनु पाटील या उपस्थित असताना मोटारसायकलवरून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने पाण्याची बाटली मागितली. फिर्यादी यांनी बाटली देत असतानाच त्या इसमाने त्यांच्या गळ्यातील सुमारे २५ ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ हिसकावून पळ काढला. याप्रकरणी डहाणू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

          दुसऱ्या घटनेत २४ मार्च २०२५ रोजी रात्री ९.५५ वाजता मुरबा येथील रहिवासी रोहीदास देव (वय ५५) हे बोईसर येथील टाटा स्टील कंपनीच्या गेट क्रमांक ४ समोर स्कूटी पार्क करत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन खेचून पळ काढला. याप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

           या दोन्ही घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखा व डहाणू पोलिस ठाण्याच्या स्वतंत्र पथकांची नियुक्ती करून तपासास गती दिली. बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहिती व तांत्रिक साधनांच्या मदतीने पथकाने सखोल शोध घेत आरोपी दिपेश सुरेश पटेल (वय २२, रा. बोईसर दांडीपाडा) यास २२ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने साथीदारासह दोन्ही चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.

         पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (पल्सर MH-48/DN-2808) व सोन्याचे दागिने असा एकूण ₹४,५८,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात ₹१,९५,५०० किंमतीची सोन्याची बोरमाळ, ₹१,७२,५०० किंमतीची सोन्याची चेन व ₹९०,००० किंमतीची मोटारसायकल यांचा समावेश आहे.

        या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक (बोईसर) व अंकिता कणसे (डहाणू) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, किरण पवार, तसेच स्थानिक गुन्हे शाखा व डहाणू पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. पुढील तपास पोउपनि दिनेश आघाव (डहाणू पोलिस ठाणे) यांच्याकडे सुरू आहे.

Leave Your Comments