ऑक्टोबर अखेरीसही पाऊस थांबेना ! शेतकर्‍यांना हवी तातडीची मदत

Date: 2025-10-30
news-banner
ऑक्टोबर अखेरचा पाऊस शेतकऱ्यांना अक्षरशः रडकुंडीला आणून सोडत आहे. आता खरी परीक्षा आहे ती प्रशासन आणि शासनाची. तात्काळ, अचूक पंचनामे करून अहवाल सादर करणे ही प्रशासनाची जबाबदारी; तर बाधित शेतकऱ्यांना तातडीची मदत उपलब्ध करून देणे, ही शासनाची.
यावर भाष्य करणारे, नवयुग पालघर, रविवार २६ ऑक्टोबर अंकातील हे संपादकीय....

https://youtu.be/zN7RChJqIBw?si=xgTWfAoeISYov9Pk

 ऑक्टोबर अखेरीसही पाऊस थांबेना !
 शेतकर्‍यांना हवी तातडीची मदत

                    पालघर जिल्ह्यात भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले असून रोज हजेरी लावणारा पाऊस दिवसागणिक या नुकसानीत भर टाकत आहे. ऑक्टोबरमधील आणि त्यातही अलिकडिल काही दिवसातील पावसामुळे तर हातातोंडाशी आलेले पीक शेतकर्‍यांना गमवावे लागले आहे. आजच्या ह्या संकटाने शेतकरी उध्वस्त झाला असून अक्षरश: रडकुंडीला आला आहे. 
          ऑक्टोबर महिना संपत आला असतानाही पावसाने विश्रांती घेतलेली नाही. सततच्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकर्‍यांवरील संकट अधिकच गडद होत चालले आहे. आता तर जिल्ह्यातील सर्वच शेतकरी अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडले आहेत असे म्हटल्यास, चुकीचे ठरणार नाही. आधीच्या अतिवृष्टीने नुकसान केल्यानंतर गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने उशीरा तयार होणारे व कापणीस तयार असलेले पीक शेतातच कोसळले असून अनेक ठिकाणी पीक पाण्यात गाडले गेले आहे. अनेक भागांत तर पावसाच्या पाण्याने खाचरेच पूर्ण भरून राहिल्याने, शेतकर्‍यांचे सर्व श्रम व खर्च वाया गेले आहेत. हातात येणारं पीक आता हातातून निसटल्याचे पाहताना, शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर हताशेचे सावट पसरले आहे.
          हवामान खात्याने येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढे नोव्हेंबरमध्येही हिच स्थिती राहिल्यास, शेतकरी कोलमडूनच पडेल. 
      यावर्षी पावसाळा तब्बल सहा महिने टिकून राहिल्याने हा विक्रमी पावसाळा ठरला आहे. जूनपूर्वीच पावसाचे आगमन झाले आणि ऑक्टोबरअखेरपर्यंत पाऊस सुरू राहिला आहे. गेल्या अनेक वर्षांतील हा सर्वाधिक प्रदीर्घ पावसाळा ठरल्याचे, तसेच अशा प्रकारचा ऑक्टोबर अखेरपर्यंत टिकून राहिलेला पाऊस आयुष्यात पहिल्यांदाच पाहत असल्याचे शेतकरी सागत आहेत.
         कृषि विभागाने यापूर्वी केलेली पाहणी व पंचनाम्यांनुसार यापूर्वीच्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील सुमारे ५० हजार शेतकर्‍यांना बसला असून नुकसानीचे हे क्षेत्र सुमारे १४ हजार हेक्टर इतके आहे. अलिकडिल पावसानंतर सध्या जिल्ह्यातील उर्वरित शेतकर्‍यांची शेतेही पावसाच्या पाण्याने भरली असून ह्या पाण्यात पीक तरंगताना दिसत आहे. या पाश्र्वभूमीवर या नवीन नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. दरम्यान यापूर्वीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले असल्याने ह्या बाधित शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळायला हवी.
       या पावसाने केवळ शेतकर्‍यांचेच नव्हे तर मच्छिमारांचेही अतोनात नुकसान झाले आहे.ऑगस्टनंतर मासेमारी हंगाम सुरु झाला.मात्र तदनंतर खराब हवामानामुळे पूर्ण हंगामच वाया गेल्याचे दिसते.नोव्हेंबरमध्ये लग्नसराई.तत्पूर्वी साखरपुडा आदि कार्यक्रमांवर देखील या पावसाचे सावट आहे.याचा फटका मंडप तसेच तत्सम सेवा पुरविणार्‍यांना बसत आहे.
           शेतकर्‍यांसह मच्छिमारांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनावर दबाव वाढविण्याची आवश्यकता आहे. हा दबाव सत्ताधार्‍यांसह विरोधकांनीही वाढवायला हवा.तर, कृषि विभागाने वस्तूनिष्ठ पंचनामे करणे गरजेचे आहे.शेतकर्‍यांनीही याकरता जागरुक रहायला हवे !

Leave Your Comments