https://youtu.be/yb0kLLRv_ro?si=4iAI-yVIjegvzGUI
पालघरमध्ये २ ते ६ नोव्हेंबरदरम्यान आर्यन हायस्कूल मैदानावर रंगणार ‘सांसद खेळ महोत्सव’
पालघर,
‘भारत क्रीडा महासत्ता’ या संकल्पनेतून प्रेरित होत पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या क्रीडा उपक्रमाचा — ‘सांसद खेळ महोत्सव’ — आरंभ २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या म.नी. दांडेकर हायस्कूलच्या मैदानावर हा महोत्सव २ ते ६ नोव्हेंबरदरम्यान पार पडणार असून, तब्बल ६ लाख २३ हजार २४८ खेळाडूंची नोंदणी झाल्याने हा देशातील विक्रमी सहभाग असलेला महोत्सव ठरणार असल्याचा दावा खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केला आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी होईल, तर समारोप आणि पारितोषिक वितरण राज्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ६ नोव्हेंबर रोजी पार पडेल. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, जिल्ह्यातील आमदार तसेच विविध मान्यवर या महोत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती सवरा यांनी दिली.
विविध क्रीडा प्रकार
या खेळ महोत्सवात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, लंगडी, वैयक्तिक मैदानी स्पर्धा, मॅरेथॉन, बॅडमिंटन, योगा आदी १० प्रमुख क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. यात शालेय, महाविद्यालयीन तसेच खुल्या गटांच्या स्पर्धाचा अंतर्भाव असून, प्रत्येक खेळात विजेत्यांना रोख पारितोषिके आणि ट्रॉफी देण्यात येतील.
डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, वसई आणि पालघर या आठही तालुक्यांतील जिल्हा परिषद, खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि आश्रमशाळा येथील विद्यार्थी सहभागी होत आहेत. जिल्ह्यातील सर्व खेळाडू एकाच मैदानावर आमनेसामने येणार असून, हा पालघरच्या क्रीडा इतिहासातील सर्वात मोठा क्रीडा सोहळा ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले . यासाठी क्रीडा तसेच शिक्षण विभागासह क्रीडा संस्था, खेळाडू आदींचे सहकार्य घेतले जात आहे.आरोग्य विभाग, नगरपरिषद तसेच भाजप पदाधिकारी स्पर्धेदरम्यान सर्वकाळ उपस्थित असतील असे सवरा यावेळी म्हणाले.
व्यवस्थापन आणि खर्च
या महोत्सवासाठी १५ समित्यांची स्थापना करून चोख आयोजन करण्यात आले आहे. अंदाजे २ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, कंपन्या आणि दानशूर व्यक्तींना आर्थिक साहाय्याचे आवाहन करण्यात आले आहे.
क्रीडा कौशल्याला वाव
“या महोत्सवाचा उद्देश ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना आणि खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. आपल्या जिल्ह्यात प्रचंड क्षमता आहे, फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज आहे,” असे खासदार डॉ. सवरा यांनी सांगितले.