पालघर जिल्हा प्रथम क्रमांक — राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेसाठी पात्रता
मुंबई विभागीय शालेय बेसबॉल स्पर्धा पालघरमध्ये उत्साहात पार
पालघर, ३० ऑक्टोबर :
मुंबई विभागीय शालेय बेसबॉल स्पर्धेत पालघर जिल्ह्याने १९ वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा स. तू. कदम विद्यालयाच्या प्रांगणात २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान उत्साहात पार पडली.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, मुख्य कार्यकारी क्रीडा अधिकारी गिरीश इरणक, जीवन विकास संस्थेचे कार्याध्यक्ष प्रणव कदम, कोमल कदम, दांडी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मनिषा तारवी, संघटनेचे राज्य सहसचिव अशोक सरोदे, जिल्हा संघटनेचे पदाधिकारी नितीन म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत मुंबई विभागातील १३ संघांनी सहभाग घेतला होता.
१९ वर्षाखालील मुलांच्या गटात पालघर जिल्हा प्रथम, मुंबई शहर जिल्हा द्वितीय आणि मुंबई उपनगर जिल्हा तृतीय क्रमांकावर राहिला.
१९ वर्षाखालील मुलींच्या गटात मुंबई उपनगर जिल्हा प्रथम, वसई-विरार महानगरपालिका द्वितीय आणि मुंबई शहर जिल्हा तृतीय क्रमांकावर राहिला.
१७ वर्षाखालील मुलांच्या गटात रायगड जिल्हा प्रथम, पालघर द्वितीय आणि मुंबई शहर जिल्हा तृतीय ठरले; तर मुलींच्या गटात रायगड जिल्हा प्रथम, नवी मुंबई महानगरपालिका द्वितीय आणि मुंबई उपनगर जिल्हा तृतीय क्रमांकावर राहिले.
या स्पर्धेत विजयी ठरलेले सर्व संघ आगामी महाराष्ट्र राज्य शालेय बेसबॉल स्पर्धेत मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.