नवयुग पालघर
**पालघर जिल्ह्यात युरिया खताचा मुबलक साठा; खरीप हंगामासाठी पुरवठा सुरळीत**
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून खते व बियाण्यांची खरेदी सुरू झाल्याचे सांगून पालघर जिल्ह्यात युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाने दिली आहे. जिल्ह्यात सध्या ४०२४.५५७ मेट्रिक टन खतसाठा असून त्यापैकी २९२१.४१७ मेट्रिक टन युरिया उपलब्ध आहे. यामुळे खरीप हंगामात खतटंचाई निर्माण होणार नसल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.
कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, उपलब्ध खतसाठ्यात ९२.९५० मेट्रिक टन डीएपी, ९९.८९९ मेट्रिक टन एमओपी, ६३९.८२० मेट्रिक टन मिश्र खते, २३५.६०१ मेट्रिक टन एसएसपी आणि ३५.१२० मेट्रिक टन इतर खतांचा समावेश असल्याचे म्हटले आहे.
शासनाकडून पालघर जिल्ह्यासाठी एकूण १५९५० मेट्रिक टन खत मंजूर करण्यात आले असून त्यात १२८०० मेट्रिक टन युरियाचा समावेश आहे. त्यापैकी १९ जूनपर्यंत ६००५.२४० मेट्रिक टन युरियाचा पुरवठा जिल्ह्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.
यापैकी एप्रिल महिन्यात ४५४.३६५ मेट्रिक टन युरिया पुरवठा झाला असून त्यातील ९९.०८९ मेट्रिक टन विक्री झाली. मे महिन्यात १९२३.४८० मेट्रिक टन पुरवठ्यापैकी ५६७.३२७ मेट्रिक टन विक्री झाली. जून महिन्यात ३६२८.७५५ मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाला असून त्यापैकी २७७१.९४७ मेट्रिक टन विक्री झाली असून या हंगामातील एप्रिल ते जून या तीन महिन्यांत एकूण ६००६.६०० मेट्रिक टन युरिया पुरवठा झाला तर ३४३८.३६३ मेट्रिक टन विक्री झाल्याची माहिती विभागाने दिली आहे.
दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेला खतसाठा औद्योगिक वापरासाठी वळवला जाऊ नये, यासाठी कृषी विभागाकडून सातत्याने तपासणी सुरू असल्याचे विभागाने म्हटले असून यापूर्वी अशा प्रकारे खत वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करून एफआयआर दाखल करण्यात आला होता अशी माहिती
जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी यांनी दिली आहे.