जिल्हा रुग्णालय व मनोर ट्रॅामा सेंटरसाठी १५ ऑगस्टचा दिलेला वायदा तरी अमलात येईल का ?

Date: 2026-07-04
news-banner
नवयुग पालघर 

***जिल्हा रुग्णालय व मनोर ट्रॅामा सेंटरसाठी १५ ऑगस्टचा दिलेला वायदा तरी अमलात येईल का ?***

 जिल्ह्यातील पालघर येथील २०० खाटांचे जिल्हा रुग्णालय तसेच मनोर येथे २०० खाटांचे सामान्य रुग्णालय आणि २० खाटांचे ट्रामा केअर युनिट आता 
१५ ऑगस्टदरम्यान सुरू होणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली असली तरी पदभरती, आवश्यक उपकरणे व अपूर्ण कामांचा विचार करता येत्या दीड महिन्यात हे आश्वासन तरी सरकारला पाळता येईल का हा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन्ही प्रकल्पांसाठी निधीची आवश्‌यकता असल्याचे शासनाने म्हटले आहे, तेव्हा हा आवश्यक निधी तरी उपलब्ध करून दिला जाईल का ?
           विधानसभेत आमदार मोहन मते व राजू तोडसाम यांनी लक्षवेधीद्वारा याकडे लक्ष वेधले होते. या चर्चेत आमदार राजेंद्र गावित, मनिषा चौधरी आदिनीही भाग घेतला. यावेळी उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. आवश्यक अतिरिक्त निधी, वैद्यकीय उपकरणे, फर्निचर, ऑक्सिजन व्यवस्था आणि पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करून हे प्रकल्प लवकरच रुग्णसेवेत दाखल करण्याचे नियोजन प्रशासनाने केले असल्याचे सांगितले. 
             आरोग्यमंत्र्यांनी अशाच प्रकारचे उत्तर मागील अधिवेशनातही दिले होते इतकेच नव्हे तर ०१ मे रोजी उदघाटन केले जाईल असे आश्वासन देखील दिले होते. मात्र त्या दरम्यान कामे पूर्ण तर झाली नाहीतच, किंबहुना आजही परिस्थितीत फारशी सुधारणा दिसत नाही 
 पालघर तालुक्यातील नंडोरे येथे २०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने, प्रशिक्षण केंद्र, नर्सिंग हॉस्टेल आणि औषध भांडार उभारण्यास शासन निर्णय दिनांक ९ ऑगस्ट २०२० रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर २१ डिसेंबर २०२० रोजी या प्रकल्पासाठी एकूण २०९ कोटी ११ लाख ११ हजार रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजुरी देण्यात आली.
 या निधीपैकी मार्च २०२६ अखेरपर्यंत १८५ कोटी 
४ लाख ७५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे सुमारे 
८५ टक्के काम पूर्ण झाले असून सध्या रंगरंगोटी आणि विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. मुख्य इमारतीचे उर्वरित काम जुलै २०२६ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे उत्तरात म्हटले आहे.
 हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी १८ कोटी ८८ लाख ३६ हजार ९९३ रुपयांच्या अतिरिक्त निधीचा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांनी १५ मे २०२६ रोजी त्रुटीपुर्ततेसह हा प्रस्ताव सादर केला असून तो सध्या मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोकण प्रादेशिक विभाग, मुंबई यांच्या स्तरावर प्रलंबित आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर उर्वरित इमारतींची कामे पूर्ण केली जाणार असल्याचेही मंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे.
 याशिवाय जिल्हा रुग्णालयासाठी फर्निचर, मेडिकल गॅस पाईपलाईन आणि उष्णता, वातानुकूलन आणि वायुवीजन प्रणाली (HVAC System) साठी २० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक जिल्हा नियोजन समितीकडे प्रशासकीय मान्यता आणि निधीसाठी सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
      मनोर येथे २०० खाटांचे सामान्य रुग्णालय आणि 
२० खाटांचे ट्रामा केअर युनिट ९८ टक्के पूर्ण
 मनोर येथे २०० खाटांचे सामान्य रुग्णालय आणि 
२० खाटांचे ट्रामा केअर युनिट उभारण्यास शासन निर्णय दिनांक १७ जानेवारी २०१३ रोजी मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पासाठी ३० जानेवारी २०२४ रोजी १२० कोटी २ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
 आरोग्यमंत्री आपल्या उत्तरात म्हणतात, या निधीपैकी मार्च २०२६ अखेरपर्यंत ९६ कोटी ८० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून, प्रकल्पाचे ९८ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित निधी त्वरीत वितरित करून ३० जून २०२६ पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
 सदर रुग्णालयासाठी मेडिकल ऑक्सिजन प्लांट आणि गॅस पाईपलाईन उभारण्यासाठी जिल्हाधिकारी, पालघर यांनी ८ मे २०२६ रोजी ५ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर यांच्यामार्फत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यारंभ आदेशाच्या टप्प्यावर काम पोहोचले असल्याचे पुढे म्हटले आहे.
       *रुग्णालयांसाठी मोठ्या प्रमाणावर पदनिर्मिती *
       पालघर जिल्हा रुग्णालयासाठी शासन निर्णय २० मे २०१६ अन्वये एकूण ३८२ कुशल आणि अकुशल पदांची निर्मिती करण्यात आली आहे. मनोरच्या विद्यमान ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयासाठी २८ पदे मंजूर आहेत. तसेच शासन निर्णय १३ फेब्रुवारी २०२५ अन्वये नव्या 
२०० खाटांच्या सामान्य रुग्णालय व २० खाटांच्या ट्रॉमा केअर युनिटसाठी १३४ नियमित पदे आणि 
२०२ काल्पनिक कुशल-अकुशल पदे अशा एकूण 
३६९ पदांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली .
 दोन्ही रुग्णालयांचे बांधकाम पूर्ण होऊन रुग्णसेवेसाठी सुरू होण्यापूर्वी आवश्यक पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात नमूद केले आहे.
आमदार गावित यांनी चर्चेत भाग घेताना ही रुग्णालये तात्काळ सुरु करण्यातील गांभीर्य निदर्शनास आणले.

Leave Your Comments