https://youtu.be/_RNoasRbSJU?si=pl80hhUP0aYen7_K
पिक नुकसान पाहण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये थेट भेट
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – भात आणि चिकू पिकांच्या नुकसानीची पाहणी; तातडीने मदत दिली जाईल
डहाणू, ता. ४ ऑक्टोबर: सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसामुळे डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भात पिके कापणीसाठी तयार असताना आडवे पडली असून, ओलाव्यामुळे भाताला मोड आले आहेत. तसेच चिकू बागांमध्ये फुलगळ आणि फळगळ झाले आहे. या पार्श्वभूमीवर वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी नुकतेच प्रभावित शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये थेट भेट देऊन परिस्थिती पाहणी केली.
पालकमंत्री नाईक यांच्या भेटीदरम्यान खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावीत, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, तहसीलदार सुनील कोळी व अमोल पाठक, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, उपविभागीय कृषी अधिकारी तरूणकुमार वैती आणि तालुका कृषी अधिकारी अनिल नरगुलवार उपस्थित होते.
पालकमंत्री नाईक यांनी डहाणू तालुक्यातील पोखरण येथील शेतकरी दत्तात्रय पाटील यांच्या भात शेतावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानाचा आढावा घेतला. त्यांनी अधिकारी यांना भात पिकाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले.
यानंतर त्यांनी डहाणू तालुक्यातील जामशेत येथील स्नेहल अनंत पोद्दार यांच्या १२ एकर क्षेत्रातील चिकू बागेचीही पाहणी केली. अतिवृष्टीमुळे फुलगळ व फळगळ झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, पालकमंत्री नाईक यांनी शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळेल असे आश्वासन दिले.
तसेच, तलासरी तालुक्यातील मौजे वडवली-ओझरपाडा येथे पूरबाधित घरे आणि भातशेतीचे पाहणीही त्यांनी केली. २८ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे वारोळी नदीचे पाणी अनेकांच्या घरात शिरल्याने ग्रामस्थांना स्थलांतर करावे लागले होते. पालकमंत्री नाईक यांनी स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधून आपदग्रस्तांना शासकीय मदत देण्याबाबत आश्वस्त केले.
पालकमंत्री नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यात येईल आणि पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडे पाठवले जातील.”