कुरगावला जिल्ह्यातील ‘सुंदर गाव’चा मान — ५० लाखांचे पारितोषिक

Date: 2025-10-04
news-banner
https://youtu.be/XgF43FOuS0Y?si=AZYSizvSFqYXDcGG

📰 कुरगावला जिल्ह्यातील ‘सुंदर गाव’चा मान — ५० लाखांचे पारितोषिक

आबा पाटील सुंदर गाव पुरस्कारांत कुरगाव अव्वल; तालुक्यातील आठ गावे सन्मानित

पालघर | दि. ४ ऑक्टोबर २०२५
         पालघर तालुक्यातील कुरगाव या गावाने ग्रामविकास क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत तालुकास्तरीय सोबत पुढे जिल्हास्तरीय ‘सुंदर गाव’ हा मान पटकावला आहे तर इतर सात गावांनी तालुका स्तरीय पुरस्कार पटकावले आहेत. ग्रामीण विकास विभागाच्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत २०२३–२४ साठी कुरगाव ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय ४० लाख आणि तालुकास्तरीय १० लाख, असे मिळून ५० लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

         मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत आयोजित रोजगार मेळावा व सेवा पंधरवडा समारोप समारंभात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांनी भूषविले. कुरगावच्या कामगिरीची दखल घेत पालकमंत्री नाईक यांच्या हस्ते ग्रामपंचायतीला पारितोषिक देण्यात आले.

🏆 तालुकास्तरीय विजेते गावांचा सन्मान

      कुरगावसह तालुकास्तरीय स्तरावर जिल्ह्यातील आठ गावांची सुंदर गाव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. प्रत्येक गावाला १० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

१. पालघर – कुरगाव
२. तलासरी – आमगाव-आच्छाड
३. वाडा – हमरापूर
४. विक्रमगड – वसुरी
५. मोखाडा – खोडाळा
६. वसई – खानिवडे
७. जव्हार – झाप
८. डहाणू – घोलवड

🎤 पालकमंत्र्यांतर्फे अभिनंदन व प्रोत्साहन

          पुरस्कार वितरण प्रसंगी पालकमंत्री गणेश नाईक यांनी विजेत्या ग्रामपंचायतींचे अभिनंदन करत ग्रामविकासासाठी प्रोत्साहनपर संदेश देताना,

> “सुंदर गाव पुरस्कार ही केवळ पारितोषिक योजना नसून ग्रामविकासाच्या दिशेने निकोप स्पर्धा आणि प्रेरणादायी चळवळ आहे. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि लोकसहभाग या माध्यमातून गावांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. निवड झालेली गावे इतरांसाठी आदर्श प्रेरणास्थान ठरतील.”

👥 मान्यवरांची उपस्थिती

          या कार्यक्रमाला खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलिस अधीक्षक यतीन देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अशोक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) इजाज अहमद शरिकमसलत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, मनरेगा विभागाचे अतुल पारसकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

🌿 कुरगावचा आदर्श विकासमॉडेल

           कुरगाव ग्रामपंचायतीने गेल्या काही वर्षांत स्वच्छता मोहिम, पर्यावरणपूरक उपक्रम, लोकसहभाग व शाश्वत विकास यावर भर देत ग्रामीण विकासाचे आदर्श मॉडेल उभे केले आहे. त्याचेच फलित म्हणून जिल्ह्यातील ‘सुंदर गाव’चा बहुमान मिळाला आहे.

Leave Your Comments