केळवे येथे निसर्गसाक्षीने रंगले वाचनवेलचे सत्र

Date: 2026-01-07
news-banner
नवयुग पालघर खास .....

https://youtu.be/nZC2t-5PKlo?si=SFy1upWoJQ31HKIE

केळवे येथे निसर्गसाक्षीने रंगले वाचनवेलचे सत्र

केळवे, दि. ४ जानेवारी —
उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणांत न्हालेला समुद्रकिनारा, समुद्राची मंद गाज, नारळाच्या झावळ्यांची सळसळ आणि त्याच लयीवर सुरू असलेला कथांचा प्रवास… अशा निसर्गरम्य वातावरणात वाचनवेल उपक्रमाचे सत्र ४ जानेवारी रोजी केळवे येथे उत्साहात पार पडले. 📚🌿
वाचनवेल उपक्रम आता वर्षपूर्तीकडे वाटचाल करत असून येत्या १२ जानेवारीला या उपक्रमाचा वर्षपूर्तीचा टप्पा गाठला जाणार आहे. हा प्रवास सहजसोप्या वाटेने झाला नसला, तरी उत्साही वाचकांच्या सातत्यपूर्ण सहभागामुळे आणि प्रेरणेमुळे हा उपक्रम अधिक बळकट होणार आहे.
केळवे येथील या सत्रात लहानग्या वाचकांनी तासभर एका जागी बसून पुस्तकांत मन रमवले. इटुकली पिकटुली पाखरं कथांच्या दुनियेत हरवलेली पाहताना उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले.

 प्रत्येक सत्र काहीतरी नवीन शिकवते, विचारांना नवी दिशा देते आणि मन अधिक प्रवाही ठेवते, अशी भावना वाचकांनी व्यक्त केली.
आजचे वाचनवेल सत्र भूषण सावे यांच्या उत्साही पुढाकारामुळे आणि चेतन सावे यांच्या प्रभावी व्यवस्थापनामुळे स्मरणीय ठरले. निसर्गरम्य परिसर उपलब्ध करून दिल्याबद्दल शेखर पाटील यांचे आयोजकांनी मनापासून आभार मानले. सामाजिक कार्यकर्ते राजीव पाटील (माजी महापौर, विरार–वसई महानगरपालिका) यांनी आवर्जून भेट देत उपक्रमास प्रोत्साहन दिले. तसेच प्रा. स्मिता पाटील यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
वाचनवेलचे नियमित वाचक, मार्गदर्शक आणि ज्येष्ठांचे पाठबळ यामुळेच ही वाचनवेल चळवळ अधिक समृद्ध होत असून, ही वेल अशीच बहरत राहो, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave Your Comments