मुरबे बंदर रद्द करण्यासाठी जनआक्रोश — जनसुनावणीपूर्वीच जिंदाल कंपनीवर धडक मोर्चा

Date: 2025-10-05
news-banner
https://youtu.be/8OG8S40rh6c?si=vpviNjtUi_fN_ABP

📰 मुरबे बंदर रद्द करण्यासाठी जनआक्रोश — जनसुनावणीपूर्वीच जिंदाल कंपनीवर धडक मोर्चा

बंदरविरोधी संघर्ष निर्णायक टप्प्यात; ग्रामस्थांचा एकजुटीचा निर्धार

बोईसर | ४ ऑक्टोबर २०२५

         मुरबे बंदर प्रकल्पाविरोधातील संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. प्रस्तावित बंदराविरोधात वाढत्या लोकक्षोभाच्या पार्श्वभूमीवर मुरबे व नांदगाव येथील ग्रामस्थांनी आज तारापूर एमआयडीसीतील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या प्रवेशद्वारावर प्रचंड मोर्चा काढत बंदर तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. ६ ऑक्टोबर रोजी होणारी जनसुनावणी रद्द करावी आणि स्थानिकांचा आवाज गांभीर्याने घ्यावा, असा इशारा संघर्ष समिती व ग्रामस्थांनी कंपनीला दिला.

          या मोर्चाची तयारी काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आली होती. त्या बैठकीत जनसुनावणीपूर्वीच जिंदाल कंपनी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर धडक देण्याची रणनीती आखण्यात आली होती. पर्यावरणीय प्रभाव अहवाल अपूर्ण व दिशाभूल करणारा असल्याचा तीव्र आक्षेप नोंदवत, केवळ प्रशासकीय आक्षेपांपुरते न राहता तीव्र जनआंदोलन उभारण्याचा एकमुखी निर्णय यावेळी घेण्यात आला होता.


🚩 मोर्चातून जनसुनावणी रद्दची मागणी

           कॅम्लिन नाक्यापासून निघालेल्या या भव्य मोर्चाचे रूपांतर जेएसडब्ल्यू कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सभेत झाले. यावेळी मुरबे जिंदाल बंदर विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसह परिसरातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, मच्छीमार संघटना, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

           संघर्ष समितीच्या वतीने कंपनीच्या व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले. प्रस्तावित बंदरामुळे किनारी गावांचे पारंपरिक मासेमारी क्षेत्र नष्ट होणार, नौकानयन मार्ग अडथळ्यात येणार, तसेच बॅकवॉटरमुळे किनाऱ्यालगतच्या गावांना पूर व गाळ साचण्याचा धोका निर्माण होणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.

          परिसरातील सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभांमध्ये प्रकल्पाला एकमुखी विरोध दर्शवणारे ठराव मंजूर केले असून, स्थानिकांचा ठाम विरोध लक्षात घेऊन हा प्रकल्प तात्काळ स्थगित करून कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

⚠️ प्रकल्पाचा व्याप आणि संभाव्य धोके

        प्रस्तावित मुरबे जिंदाल बंदर प्रकल्प सुमारे १०६५ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार आहे. मुरबे व खारेकुरण गावांतील जमीन रस्ता व रेल्वे जोडणीसाठी बाधित होईल. बंदरात १६ बर्थची तरतूद असून वार्षिक १३४.७ दशलक्ष टन मालवाहतुकीचे लक्ष्य आहे. यामुळे दररोज हजारो ट्रक आणि मालगाड्या या परिसरातून धावतील, कोळसा, क्रूड ऑइल, सीएनजी, एलपीजी, स्टील यांसारख्या घातक पदार्थांची वाहतूक होईल — परिणामी पर्यावरणीय प्रदूषण, आरोग्य धोक्यांचे प्रमाण वाढेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

           दक्षिणेला १०,००० मीटर व उत्तरेला १,३०० मीटर लांबीचे तरंग प्रतिबंधक बंधारे बांधले जाणार आहेत. याचा परिणाम सातपाटीपासून नांदगाव-नवापूरपर्यंत किनारी भागात जाणवणार आहे. तसेच सुमारे ३७ दशलक्ष घनमीटर समुद्रगाळ उपसा (ड्रेजिंग) करण्यात येणार असून त्यातील बहुतांश गाळ समुद्रात टाकण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे किनारी भागात गाळ साचणे, पूरस्थिती आणि परिसंस्थेचा ऱ्हास होण्याचा धोका वाढेल.


👥 बैठकीत आंदोलनाचा लढाऊ पवित्रा

           मोर्चापूर्वी झालेल्या बैठकीत वक्त्यांनी कंपनीच्या सीएसआर निधीद्वारे स्थानिकांना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. नांदगाव बंदरविरोधी लढ्यात दाखवलेली एकजूट आता मुरबे प्रकल्पाविरोधातही दाखवण्याचे आवाहन करण्यात आले.
“हे खाजगी बंदर आहे; अशा बंदरांचा शिरकाव कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही,” असा ठाम सूर व्यक्त झाला. धरणे, निदर्शने, दबाव तंत्र या मार्गाने सरकार व कंपनीवर दबाव आणण्याचे ठरले.

📌 मोर्चाला मोठा जनसमर्थनाचा प्रतिसाद

         मोर्चाला मुरबे जिंदाल बंदर विरोधी संघर्ष समितीच्या अध्यक्षा व सरपंच मोनालिसा तरे, सचिव प्रमोद आरेकर, खजिनदार सचिन पाटील, सल्लागार जयेश गावड, तसेच नांदगाव सरपंच समीर मोरे, आलेवाडी सरपंच राजेंद्र वाडीकर, नवापूर सरपंच अंजली बारी, कुंभवली सरपंच तृप्ती संखे, सातपाटी सरपंच सीमा भोईर यांच्यासह परिसरातील उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मच्छीमार व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, मनसे जिल्हाप्रमुख समीर मोरे व भावेश चुरी, धीरज गावड, अजित राणे आणि विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave Your Comments