घोलवड रेल्वे स्थानकाच्या सुविधा व मेमू फेऱ्या वाढविण्याबाबत ग्रामस्थ एकवटले

Date: 2026-03-05
news-banner
नवयुग पालघर, विशेष बातमी : 

घोलवड रेल्वे स्थानकाच्या सुविधा व मेमू फेऱ्या वाढविण्याबाबत ग्रामस्थ एकवटले

पश्चिम रेल्वे वरील घोलवड रेल्वे स्थानकावरील मूलभूत सुविधांचा अभाव दूर करणे, मुंबई व सुरत दिशेने मेमू (MEMU) गाड्यांच्या फेऱ्या वाढविणे, काही प्रमुख जलद गती गाड्यांना थांबा देणे, फलाटाचा विस्तार करणे, स्वच्छतागृह व प्रतीक्षागृह उभारणे, अतिरिक्त पादचारी पूल बांधणे, उदवाहन/सरकता जिना सुविधा उपलब्ध करणे तसेच मुंबई उपनगरीय लोकल सेवा घोलवड/उंबरगावपर्यंत वाढविणे या प्रमुख मागण्यांसाठी 
२६ फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांच्या वतीने घोलवड रेल्वे स्थानकाचे अधीक्षक विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.

पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे कृषी व पर्यटन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोलवड परिसरातील नागरिकांना मुंबई व सुरत येथे प्रवासासाठी रेल्वे हाच मुख्य आधार आहे. विद्यार्थी, नोकरदार वर्ग, व्यावसायिक तसेच पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता विद्यमान रेल्वे सुविधा अपुऱ्या पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर
ग्रामस्थांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे, मुंबईq सेंट्रल विभाग यांना सविस्तर निवेदन देत मुंबईकडे सकाळी बलसाड फास्ट पॅसेंजरपूर्वी एक मेमू सेवा, सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान एक अतिरिक्त सेवा व सायंकाळी ४.३० ते ८ दरम्यान एक सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. 
सुरतकडे सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ४ ते ७ दरम्यान प्रत्येकी एक मेमू सेवा सुरू करावी तसेच रात्री ९ नंतर आणखी एक सेवा उपलब्ध करावी, अशीही मागणी यात करण्यात आली.

याशिवाय फ्लाईंग राणी व वडोदरा एक्सप्रेस या गाड्यांना घोलवड येथे थांबा देण्यात यावा, जेणेकरून परिसरातील गावांना मुंबई व सुरतशी थेट व सुलभ संपर्क मिळेल, असे नमूद करण्यात आले आहे. सध्या डहाणूपर्यंत मर्यादित असलेली मुंबई उपनगरीय लोकल सेवा घोलवड किंवा उंबरगाव/वापीपर्यंत वाढविण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
स्थानकावरील इतर समस्यांमध्ये फलाट क्रमांक ३ व ४ ची लांबी वाढविण्याची आवश्यकता, फलाट १ व ४ वरील मालगाड्यांचे सायडिंग थांबविणे, पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह , सुसज्ज प्रतीक्षागृह, पूर्व-पश्चिम जोडणीसाठी ज्यादा पूल , तिकीट खिडकीजवळ उदवाहन किंवा सरकता जिना सुविधा तसेच परतीची तिकिटे उपलब्ध करणे यांचा उल्लेख करण्यात आला. बोर्डी परिसरात स्थानिक गाड्यांसाठी यार्ड उभारण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, महिला व शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित चढ-उतार करण्यासाठी सध्याची व्यवस्था अपुरी असल्याने ती तातडीने सुधारावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. काही गाड्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी पायऱ्यांचा आधार घ्यावा लागतो, ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

घोलवड परिसरात रेल्वे सुविधा वाढवल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, पर्यटनवृद्धी होईल तसेच शिक्षण, रोजगार व व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या वेळी ॲड. तेजस काळे, घोलवड ग्रामपंचायत सरपंच रवींद्र वसंत बुजाड, उपसरपंच कुणाल शाह, दिगंबर राऊत तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाने या सर्व मागण्यांचा सकारात्मक व तातडीने विचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

Leave Your Comments