महा आवास व संत गाडगेबाबा अभियानात पालघर जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी

Date: 2026-03-05
news-banner


** महा आवास व संत गाडगेबाबा अभियानात पालघर जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी**

कोकण विभागीय स्तरावरील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तसेच महा आवास अभियान (ग्रामीण) पुरस्कार वितरण सोहळा
२५ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई येथील कोकण भवन येथे आयोजित करण्यात आला. ,या सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते विविध जिल्हे, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात पालघर जिल्ह्याने सलग तीन वर्षांच्या दमदार कामगिरीमुळे विशेष लक्ष वेधले.

*महा आवास अभियानात पालघर जिल्ह्याची झेप*

जिल्हा परिषद पालघरने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत आवास योजना प्रभावीपणे राबवित २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या कालावधीत विभागस्तरावर उल्लेखनीय स्थान मिळवले.

 २०२१-२२:
प्रधानमंत्री आवास योजना – सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद गटात तृतीय क्रमांक
राज्य पुरस्कृत आवास योजना – द्वितीय क्रमांक
 २०२२-२३ :
राज्य पुरस्कृत आवास योजना – तृतीय क्रमांक
वाळू उपलब्धता बाबत तहसीलदार, जव्हार यांनी प्रथम क्रमांक
 २०२३-२४ :
प्रधानमंत्री आवास योजना – सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद गटात प्रथम क्रमांक
राज्य पुरस्कृत आवास योजना – प्रथम क्रमांक
याशिवाय पंचायत समिती गटात विक्रमगड प्रथम, 
वाडा द्वितीय व
 पालघर तृतीय क्रमांकावर राहिले.

 ग्रामपंचायत गटात मोज (ता. वाडा) प्रथम तर 
खुडेद (ता. विक्रमगड) द्वितीय क्रमांकावर राहिली. 
राज्य पुरस्कृत आवास योजनेत पंचायत समिती वाडा ने प्रथम क्रमांक पटकावला.

पालघर, वसई, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी आणि डहाणू या तालुक्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांनी उद्दिष्टपूर्ती, गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी आणि समन्वयाच्या बळावर हे यश संपादन केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

*संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात विशेष गौरव*

 संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत विभागस्तरावरील पुरस्कारांचेही वितरण या दरम्यान करण्यात आले. 
पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील टेंभी ग्रामपंचायतीला २०२०-२१ व २०२१-२२या कालावधीत विशेष पुरस्कार जाहीर झाला.

या अभियानाचा उद्देश ग्रामीण भागातील स्वच्छता, आरोग्य सुधारणा आणि वृक्षलागवड यांना चालना देणे हा असून, प्रत्येक ग्रामसभेत ग्रामगीतेतील विचारांचा प्रसार व्हावा, असे मत विभागीय आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सांगितले की, महा आवास अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना सन्मानाने निवारा उपलब्ध झाला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या समन्वयातून हे यश शक्य झाले असून पुढील काळातही दर्जेदार कामगिरी कायम राखण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनीही नियोजनबद्ध कार्यपद्धती, सातत्यपूर्ण आढावा आणि तळागाळातील प्रभावी समन्वय यामुळेच सलग यश मिळाल्याचे नमूद केले.
सलग तीन वर्षांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे कोकण विभागात पालघर जिल्ह्याची मान उंचावली असून जिल्हा परिषद प्रशासन, पंचायत समित्या, ग्रामपंचायती तसेच संबंधित अधिकारी-कर्मचारी यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave Your Comments