विरार वसई मनपा व उमेदतर्फे विरारमध्ये ‘कोकण सरस २०२६’चा भव्य मेळावा; महिला स्वयंसहायता समूहांच्या १५० स्टॉल्सची रेलचेल

Date: 2026-03-05
news-banner
*नवयुग पालघर विशेष :

*विरार वसई मनपा व उमेदतर्फे विरारमध्ये ‘कोकण सरस २०२६’चा भव्य मेळावा; महिला स्वयंसहायता समूहांच्या १५० स्टॉल्सची रेलचेल**

 ‘कोकण सरस २०२६’ विक्री व प्रदर्शन मेळावा १२ ते १६ मार्च २०२६ दरम्यान विरार येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. वसई विरार महानगरपालिकाचे महापौर अजीव पाटील यांच्या सहकार्याने, जिल्हा परिषद पालघर, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

म्हाडा मैदान (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स), जकात नाका, विरार (पश्चिम), ता. वसई, जि. पालघर येथे दररोज सकाळी १०.०० ते रात्री १०.०० या वेळेत मेळावा सर्वांसाठी खुला राहणार आहे.

कोकण विभागातील विविध जिल्ह्यांतील महिला स्वयंसहायता समूहांचा या मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग असून हस्तकला, प्रक्रिया उद्योग व खाद्यपदार्थांचे एकूण १५० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.

 स्वयंसहायता समूहांनी तयार केलेले विविध खाद्यपदार्थ, घरगुती मसाले, पारंपरिक ग्रामीण हस्तकला, कलाकुसरीच्या वस्तू, वारली पेंटिंग, कापडी पिशव्या तसेच विविध हस्तनिर्मित उत्पादने नागरिकांना खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, उत्पन्नवाढीस चालना देणे आणि आर्थिक सक्षमीकरणाला बळ देणे 
हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

खवय्यांसाठी यंदा खास आकर्षण सज्ज असणार आहे. सिंधुदुर्गपासून ते मोखाड्यापर्यंतच्या ग्रामीण पारंपरिक चवींचा आस्वाद या मेळाव्यात घेता येणार आहे. पुरणपोळी, उकडीचे मोदक, घावणे, रस शिरवाळे, कोंबडी-वडे, नाचणीची भाकरी यांसह कोकणातील ताजे समुद्री खाद्यपदार्थ येथे उपलब्ध राहणार आहेत. पारंपरिक पाककलेचा अस्सल व घरगुती स्वाद अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी मेळाव्यात नियंत्रण कक्ष तसेच आरोग्य कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.

 मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते यांच्या नियोजनातून राबविण्यात येत आहे. तसेच महानगरपालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.), अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे व दीपक सावंत यांच्या सहकार्यातून हा मेळावा यशस्वी करण्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

कोकण स्तरावरील या सरस मेळाव्यामुळे महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांना दीर्घकालीन ग्राहकवर्ग निर्माण करण्याची आणि व्यापक बाजारपेठेत स्थिर स्थान मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण महिलांच्या कष्ट, कौशल्य आणि उद्यमशीलतेला चालना देणारा हा उपक्रम सामाजिक व आर्थिक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Leave Your Comments