https://youtu.be/yRWmTuyYggA?si=mPLHmq0uCBHsOYlF
खड्डेमुक्तीसाठी युवकांचा पुढाकार; दहिसर फाटा–गोवाडे रस्त्यावर धरती पुत्र संस्थेची मोहीम
पालघर, दि. 5 ऑक्टोबर 2025 — नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) कडून दुर्लक्षित राहिलेल्या दहिसर फाटा–गोवाडे मुख्य रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांवर आता स्थानिक नागरिकांनीच उपाययोजना सुरू केली आहे. धरती पुत्र सामाजिक सेवा संस्था अध्यक्ष धनेश दांडेकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच धुकटण गावातील सहकाऱ्यांच्या मदतीने या रस्त्याचे खड्डे भरण्याची मोहीम हाती घेण्यात आली.
नॅशनल हायवे विभागाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या असूनही NH160A महामार्गावर खड्डे कायम राहिल्याने हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातांमध्ये दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत — मेघा घनश्याम पाटील (वय 43) भक्तीवेदांत हॉस्पिटलमध्ये तर अनिता अनील पाटील नावझे या मुंबईतील वोखार्ड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती संस्थेने दिली आहे.
मुंबई–वडोदरा महामार्गाचे काम वेगाने सुरू असताना या जोडरस्त्यांची दुरवस्था मात्र जसच्या तशीच राहिली आहे. पालघर–बोईसर औद्योगिक परिसरात हजारो कामगार दररोज मोटरसायकलवरून प्रवास करतात; परंतु संध्याकाळी घरी सुखरूप पोहोचू का, की रुग्णालयात जावं लागेल याची अनिश्चितता निर्माण झाली आहे.
धरती पुत्र संस्थेने इशारा दिला आहे की, पुढील सात दिवसांत जर संबंधित विभागाकडून रस्त्यांवरील खड्डे न भरल्यास नॅशनल हायवे कार्यालयावर तीव्र आंदोलन आणि धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांनीही या मोहिमेला सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे.