https://youtu.be/oWEihtpvots?si=CD_m_zQxBhtRkl5R
इपीएस पेन्शनधारकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू — खासदार हेमंत सवरा यांची ग्वाही
आमदार राजेंद्र गावित : न्यायासाठी एकजुटीने लढा देऊ
पालघर :
“इपीएस पेन्शनधारकांच्या न्याय्य मागण्यांसाठी केंद्र व राज्य पातळीवर ठामपणे आवाज उठवू आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव सोबत राहू,” अशी ठाम ग्वाही खासदार हेमंत सवरा यांनी दिली. तर आमदार राजेंद्र गावित यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनासह पेन्शनधारकांच्या हक्कांसाठी एकजुटीने लढा देऊ असे आश्वासन दिले.
पालघर येथे जिल्हा पातळीवरील इपीएस पेन्शनधारकांचा मेळावा, नवा निर्धार आणि हक्कांसाठीचा लढा अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उदघाटन खासदार हेमंत सवरा यांनी केले तर अध्यक्षस्थान आमदार राजेंद्र गावित यांनी भूषवले. कार्यक्रमादरम्यान कार्याध्यक्ष अशोक राऊत व खजिनदार रवींद्र कदम यांनी नवनिर्वाचित आमदार गावित व खासदार सवरा यांचा संघटनेतर्फे सत्कार केला.
मेळाव्याचे स्वागत सरचिटणीस प्रदीप पाटील यांनी केले, तर जिल्हाध्यक्ष अनिल ताहाराबादकर यांनी प्रास्ताविकातून पेन्शनधारकांच्या व्यथा मांडल्या. त्यांनी सांगितले की, देशातील इपीएस पेन्शनधारक हा सर्वात उपेक्षित वर्ग असून त्यांना केवळ ₹1,000 ते ₹3,500 इतकी अत्यल्प पेन्शन मिळते. कोशियारी समिती अहवालानुसार ₹9,000 पेन्शन व महागाई भत्ता ही पेन्शनधारकांची रास्त मागणी आहे. याशिवाय बँक व्याजदरातील घट आणि रेल्वे तिकीट सवलतीच्या बंदीमुळे त्यांची परिस्थिती आणखीनच कठीण झाली आहे.
खासदार सवरा यांनी या तिन्ही प्रमुख मागण्यांचा स्वतः पाठपुरावा करण्याचा व पेन्शनधारकांच्या लढ्यात कायम साथ देण्याचा शब्द दिला. आमदार गावित यांनी राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ₹7,000 मानधन देण्यासाठी जारी केलेल्या राजपत्रातील तरतुदींचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास ठाकूर यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटक सचिव हेमंत पाटील यांनी केले. उपाध्यक्ष भगवान सांबरे, टी. के. पाटील, सुभाष मोरे, शांताराम पाटील, जयप्रकाश झवेर, विलास जाधव, दीपक जोशी आदींनीही पेन्शनधारकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दत्ता पाटील, रमेश पाटील, अशोक मुकणे, शैलेश राणा, अनंत कुडू, आलेक्स डिकून्हा, रवींद्र आजगांवकर, सूर्यकांत पिंपळे, दस्तगीर शेख आदींनी परिश्रम घेतले.
दोन महिन्यांत पेन्शनधारकांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्यास डिसेंबरमध्ये दिल्लीत निकराचे आंदोलन उभारण्याचा निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.