https://youtu.be/o6QmBUPxDCg?si=3h1eJZn3WUTmx2A7
डहाणूतील शंकरपाडा निसर्ग शाळेची अंतराळभरारी
नासाच्या ‘अर्टेमिस-२’ मोहिमेत २७४ विद्यार्थी व ११ शिक्षकांची नावे चंद्राभोवती जाणार
पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शंकरपाडा प्राथमिक व माध्यमिक निसर्ग शाळेने पुन्हा एकदा अंतराळ विश्वाशी आपले नाते जोडले आहे. नासाच्या आभासी पाहुणे : तुमचे नाव चंद्रावर पोहचवा (युअर नेम टू द मून) या आंतरराष्ट्रीय उपक्रमांतर्गत शाळेतील २७४ विद्यार्थी व ११ शिक्षकांची नावे अर्टेमिस-२ या मानवयुक्त चंद्रमोहिमेद्वारे चंद्राभोवती प्रवास करणार आहेत. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित सर्वांना नासाकडून अधिकृत डिजिटल ‘बोर्डिंग पास’ प्राप्त झाले असून त्यांचे वितरण शाळेत करण्यात आले.
यापूर्वी २०१९-२० मध्ये मार्स मोहिमेतही या शाळेने सहभाग नोंदवला होता. आता अर्टेमिस-२ मोहिमेत सहभाग मिळाल्याने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक उंचावला आहे.
पुढाकार शिक्षकांचा, उंच भरारी विद्यार्थ्यांची
शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र अहिरे व राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक विजय हणमंतराव वाघमारे यांनी नासाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळेत नोंदणी करून या उपक्रमात सहभागी होण्याचा मान मिळवला. त्यामुळे शंकरपाड्यासारख्या दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची नावे आता ‘ओरियन’ या अंतराळयानाद्वारे चंद्राच्या कक्षेत पोहोचणार आहेत.
नासाच्या माहितीनुसार, सहभागी नागरिकांची नावे डिजिटल स्वरूपात एका मेमरी स्टोरेज डिव्हाइसवर संग्रहित करून ती अर्टेमिस-२ मोहिमेत पाठवली जातात. विद्यार्थ्यांना या ऐतिहासिक मोहिमेचे प्रक्षेपण ऑनलाईन पाहण्याची संधीही मिळणार आहे.
अर्टेमिस-२ : ५४ वर्षांनंतर मानवाची चंद्राकडे झेप
अर्टेमिस-२ ही नासाची मानवयुक्त चंद्राभोवतीची मोहीम असून फ्लोरिडातील कॅनेडी स्पेस सेंटरवरून तिचे प्रक्षेपण २०२६ पूर्वी नियोजित आहे. या मोहिमेत रीड वायस्मन, विक्टर ग्लोव्हर, क्रिस्टीना कोच आणि जेरेमी हॅन्सन हे चार अंतराळवीर सुमारे १० दिवसांचा प्रवास करून चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार आहेत. ही मोहीम भविष्यातील मानवी चंद्रलँडिंगसाठी आवश्यक तंत्रज्ञानाची चाचणी करणार आहे. अंतराळयान सुमारे २१ लाख किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार करणार असून १९७२ नंतर प्रथमच मानव चंद्राच्या दिशेने प्रयाण करणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी नवचैतन्य
या उपक्रमामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, गणित आणि अवकाश संशोधनाविषयी विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. शाळेत खान अकॅडमीमार्फत राबविण्यात येणाऱ्या
‘डॉ. जयंत नारळीकर गणित-विज्ञान समृद्धी’ कार्यक्रमाचाही यासाठी सकारात्मक उपयोग झाल्याचे सांगितले जात आहे.
प्रतिक्रिया
“या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला चालना मिळेल. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होईल. नासाच्या ऐतिहासिक मोहिमेत विद्यार्थ्यांची नावे समाविष्ट होणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
— संजय वाघ, गटशिक्षणाधिकारी, डहाणू
“गणित व विज्ञान विषयांवरील डिजिटल साधनांचा प्रभावी वापर आणि शिक्षकांचा पुढाकार यामुळेच हे शक्य झाले. शंकरपाडा निसर्ग शाळेची ही कामगिरी संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे.”
— सोनाली मातेकर, शिक्षणाधिकारी, जि. प. पालघर
चौकट : सर्वांचे अभिनंदन
या अभिनव उपक्रमाबद्दल शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, डायटचे प्राचार्य संभाजी भोजने, गटशिक्षणाधिकारी संजय वाघ, विस्तार अधिकारी राजुदास जाधव, केंद्रप्रमुख पंकज पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र अहिरे, शिक्षक अनिल कोळी, रूपाली धामणे, महेंद्र रणबावळे, महादेव नरवाडे, प्रीती नगवासी, सुमित राहे, पियुष वाडू, अंकिता वायडा, प्राची काकड तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.