नवयुग पालघर विशेष :
**७ ते १४ मार्चदरम्यान महसूल विभागांतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ची सुरुवात**
नागरिक व शेतकऱ्यांचे महसूल विषयक प्रश्न जलदगतीने सोडवण्यासाठी जिल्ह्यात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा क्र. १” सुरू करण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात ७ ते १४ मार्च दरम्यान विविध तालुक्यांमध्ये मंडळ स्तरावर होणाऱ्या शिबिरांद्वारे करण्यात येणार असून, नागरिकांना महसूल सेवांचा लाभ एका ठिकाणी देण्याचा उद्देश आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रणजीत देसाई, भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक नरेंद्र पाटील आणि तहसीलदार रमेश शेंडगे उपस्थित होते.
*अभियानाचा उद्देश*
सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न त्वरित सोडवणे, जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणे, तसेच डिजिटल सेवांचा अधिकाधिक वापर वाढवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अभियांनातर्गत मार्च ते मे या कालावधीत मंडळ स्तर, मनपा, नगरपरिषद आणि नगरपंचायत पातळीवर एकदिवसीय समाधान शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबिरांमध्ये नागरिकांचे प्रलंबित महसूल विषयक प्रश्न तात्काळ निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे.
*कोणत्या सेवा मिळणार*
या शिबिरांमध्ये खालील सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत:
*एकाच खिडकीत सर्व प्रकारचे अर्ज स्वीकारणे व आवश्यक प्रक्रिया करून निकाली काढणे
*भोगवटदार वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतर
*प्रलंबित फेरफार प्रकरणे शिबिरांचे दिवशी निकाली काढणे
*७/१२ उताऱ्यातील त्रुटी दुरुस्ती
*“जिवंत ७/१२” मोहिमेद्वारे जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणे
*उत्पन्न, जात, रहिवासी, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रांसाठी अर्ज व वितरण
*ई-मोजणी, अँग्रीस्टॅक व पीएम किसान योजनेविषयी मार्गदर्शन
*अकृषिक तरतुदीतील सुधारणांची माहिती देणे
*एक वेळचे अधिमूल्य भरणा, नवीन तरतूद माहिती देणे
*डिजिटल ७/१२ कायदेशीर असल्याची माहिती देणे
*भू संपादन केलेल्या/अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणांची नोंद घेऊन अभिलेखात नोंदी अद्ययावत करणे
*तक्रार निवारण*
महाभूमी पोर्टलवरून मिळणाऱ्या क्यूआर कोडयुक्त डिजिटल ७/१२ उताऱ्याला कायदेशीर वैधता असल्याने नागरिकांना तहसील कार्यालयातून स्वाक्षरीयुक्त प्रत घेण्याची गरज नाही. शिबिरांमध्ये डिजिटल ७/१२ डाउनलोड करण्याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
*‘सिंगल विंडो’ पद्धतीने सेवा*
शिबिरांमध्ये ,एक खिडकी निपटारा पद्धती लागू केली जाणार असून तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी एकाच ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांचे अर्ज स्वीकारतील आणि शक्य तितक्या प्रकरणांवर तात्काळ निर्णय घेतला जाईल.
७ ते १४ मार्चदरम्यान होणारी प्रारंभीची शिबिरे (तालुका निहाय)
पालघर तालुका
७ मार्च २०२६ – ग्रामपंचायत सभागृह, भाजी मार्केट, माहीम
१४ मार्च २०२६ – लाल बहादूर शास्त्री विद्यालय, मनोर
वसई तालुका
७ मार्च २०२६ – महावीर धाम जैन मंदिर, शिरसाड फाटा
९ मार्च २०२६ – सेंट जोसेफ कॉलेज, नंदाखाल कोफराड (आगाशी)
१४ मार्च २०२६ – अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर, विरार पूर्व
डहाणू तालुका
७ मार्च २०२६ – ग्रामपंचायत कार्यालय, चिंचणी
१४ मार्च २०२६ – शामराव परळेकर महाविद्यालय, आशागड
वाडा तालुका
७ मार्च २०२६ – ग्रामपंचायत कार्यालय, कुडूस
९ मार्च २०२६ – ग्रामपंचायत कार्यालय, मांडवा
१४ मार्च २०२६ – ग्रामपंचायत कार्यालय, हमरापूर (कंचाड)
विक्रमगड तालुका
७ मार्च २०२६ – तलाठी कार्यालय, विक्रमगड
१४ मार्च २०२६ – ग्रामपंचायत कार्यालय, देहर्जे (चिंचघर)
जव्हार तालुका
७ मार्च २०२६ – रेड सॉईल रिसॉर्ट, जव्हार
१४ मार्च २०२६ – आश्रमशाळा, देहरे (साखरशेत)
मोखाडा तालुका
७ मार्च २०२६ – साई मंदिर, मोखाडा
१४ मार्च २०२६ – ग्रामपंचायत कार्यालय, खोडाळा
तलासरी तालुका
७ मार्च २०२६ – ज्ञानमाता हायस्कूल, झरी
१४ मार्च २०२६ – ठक्करबाप्पा हॉल, तलासरी
जिल्ह्यातील सर्व विभागांनी समन्वय साधून हे अभियान लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिरांमध्ये सहभागी होऊन महसूल विषयक प्रलंबित प्रश्न सोडवून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.