नगरपरिषद : टेंभोडे तलाव सुशोभीकरणाच्या नावाखाली आधारभिंत बांधण्यासाठी १०,००,००,००० रु.चा खर्च

Date: 2025-10-06
news-banner
https://youtu.be/W3B_IZMbAhY?si=1QrtREFiVzfsgSdi

नवयुग पालघर विशेष बातमी

नगरपरिषद : टेंभोडे तलाव सुशोभीकरणाच्या नावाखाली     
  आधारभिंत बांधण्यासाठी १०,००,००,००० रु.चा खर्च

 पालघर नगरपरिषदेची कोटीच्या कोटी उड्डाणे चालूच असून आता टेंभोडे येथील तलाव सुशोभीकरणच्या कामासाठी तब्बल ०९ कोटी ९९ लाख ५७ हजार ६०२ म्हणजेच दहा कोटी इतकी रक्कम खर्च केली जाणार आहे. टेंभोडे- खारेकुरण तसेच पालघर-खारेकुरण या रस्त्यावर हा तलाव आहे.
        तलाव सुशोभीकरण असे नाव या कामास देण्यात आले असले तरी या १० कोटी इतक्या खर्चाच्या कामांमध्ये तलाव सम पातळीत आणण्यासाठी एक कोटी ३० लाख ९ हजार ३८७ तर तलावा सभोवती आधारभिंत (रिटेनिंग वॉल)उभी करण्यासाठी तब्बल ०६ कोटी ७८ लाख ८२१ इतका खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे तलावातील पाणी बाहेर काढण्यासाठी २३ लाख ८० हजार ९२८ इतक्या रकमेची तरतूद केली आहे.
         तलाव समपातळीत आणणे आणि सभोवताली आधारभिंत उभी करणे यालाच सुशोभीकरण म्हणण्याचा नवीन पायंडा पालघर नगरपरिषदेने त्यांचे सल्लागार व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सोबत घेऊन पाडल्याचे नगरपरिषदेचे माजी गटनेते कैलास म्हात्रे यांनी म्हटले आहे.या १० कोटीच्या खर्चात सुशोभीकरण आहे कुठे असा सवाल विचारत ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे असा म्हात्रे यांचा आरोप आहे.
          या कामाचे अंदाजपत्रक नाशिक येथिल एकम वेंचर कन्सल्टंट यांनी तयार केले असून नगरपरिषदेच्या संबंधित शहर अभियंत्यांनी तपासून प्रमाणपत्रासहित सादर केले असल्याचे नमूद करून याला अनुसरून तांत्रिक मान्यता देण्यात येत असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांनी स्वतंत्र पत्रात म्हटले आहे.
           आधारभिंत उभी करण्याच्या कामांतर्गत, आधारभिंतीच्या पायासाठी १.५ मीटर खोदाई केली जाणार आहे. यात काही भागात माती खोदाई तर काही भागात कठीण मुरूम असल्याने तो फोडण्यासाठी २१ लाख इतका खर्च धरला आहे. मात्र हा भाग कडक असूनही यावर ९ इंच दगडाची सोलिंग करण्यात येणार असून 

यासाठी १५ लाख ९३ हजार इतक्या खर्चाची तरतूद केली आहे. यातच मागील भागात माती भराव साठी खर्चाची तरतूद ठेवली आहे. कडक मुरूम फोडून किंवा माती खोदाई करून तेथेच भरावासाठी माती/मुरूम उपलब्ध असताना, ही खर्चाची वेगळी तरतूद का, असा प्रश्न उपस्थित होतो. साहजिकच नगरपरिषद अंतर्गत अन्य कामांप्रमाणे ह्या कामातही खर्च फुगवून दाखवल्याला पुष्टी मिळत आहे.
         या कामाचे भूमिपूजन करण्यासंदर्भात संबंधात देखील अलीकडेच काही माजी नगरसेवकांकडून प्रयत्न केले जात होते व त्याप्रमाणे जाहिरातही करण्यात आली होती मात्र कुठे तरी घोडे अडले व तूर्तास हे भूमिपूजन स्थगित करण्यात आल्याचे समजते.
       खरंतर अशा प्रकारे प्रशासनातर्फे कोणताही अधिकृत भूमिपूजनाचा कार्यक्रम ठरवलेलं नसताना माजी नगरसेवकांनी भूमिपूजन करण्याचा घाट कोणाच्या संमतीने आणि कोणाच्या आशीर्वादाने घातला होता हे समजलेले नाही.
        हे काम नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरवणे या योजनेअंतर्गत करण्यात येत असल्याचे अधिकृत पत्रात म्हटले आहे. जिल्हाधिकारी यांनी ०४ डिसेंबर २०२४ अन्वये प्रशासकीय व वित्तीय मंजुरी दिलेली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १७ मार्च २०२५ रोजी या अंदाजपत्रकाला तांत्रिक मंजुरी दिलेली आहे. हा तलाव सध्या काठोकाठ भरलेला आहे. असे असले तरी तब्बल २३ लाखाहून अधिक खर्च करून तलावातील पाणी उपसा करणे कितपत योग्य आहे हा प्रश्न उपस्थित होतो. हे काम दीपक पिंपळे या ठेकेदाराला देण्यात आलेले असून प्रत्यक्षात मात्र अन्य व्यक्तीच हे काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी पालघर नगरपरिषदेच्या गणेश कुंड तलावासाठी झालेला कोट्यवधीचा खर्च वादात अडकला त्याचबरोबर अल्याळी येथील तलावाचा खर्चही असाच वादग्रस्त ठरलेला आहे.
        तलावा सभोवतालची ही भिंत ४८० मीटर लांबीची ४.२७ मीटर उंचीची असून यासाठी २२० टन स्टील वापरले जाईल असे अंदाजपत्रकातील माहितीवरून दिसून येते

Leave Your Comments