https://youtu.be/YRJqoS1CTzQ?si=S_Rr4kW287fVbQ4w
तलाव सुशोभीकरणात २४ लाख पाण्यात ? पालघर नगरपरिषदेच्या कामावर प्रश्नचिन्ह
पालघर : पालघर नगरपरिषद तब्बल २४ लाख रुपये अक्षरशः पाण्यात घालवत आहे. पाऊस अधेमधे हजेरी लावत असतांनाच टेंभोडे महाविद्यालय व पालघर–खारेकुरण रस्त्यालगतच्या तलावांचे सुशोभीकरणाचे काम घाईघाईने सुरू केल्याने प्रशासन कोणापुढे हतबल आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
या कामासाठी एकूण १० कोटी रुपये खर्च होणार असून ‘सुशोभीकरण’ या नावाखाली प्रत्यक्षात तलावाभोवती सिमेंट-काँक्रीटची भिंत उभारण्याचेच काम होत असल्याची माहिती आराखड्यातून पुढे आली आहे. कामाचे नाव तलाव सुशोभीकरण, पण सुशोभीकरणाचा थांगपत्ता नाही,तर मग हे काम कशासाठी असा सवाल ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत .
यातील प्रश्न उपस्थित करणारा प्रमुख मुद्दा म्हणजे—
तलावातील पाणी काढण्यासाठी अंदाजपत्रकात करण्यात आलेली २३ लाख ८० हजार ९२८ रुपयांची तरतूद. हा तलाव पावसाळा संपल्यावर काही महिन्यांत नैसर्गिकरित्या आटतो. अशा स्थितीत स्वतंत्रपणे जवळपास २४ लाख रुपये खर्चून तलाव आटवण्याची गरज नक्की काय? असा सवाल नवयुग पालघरने यापूर्वीच उपस्थित केला होता. ही तरतूद म्हणजे सरकारी व पर्यायाने जनतेच्या तिजोरीवरचा डल्लाच असल्याची टीका पुन्हा जोर धरत आहे.
ऑक्टोबर महिन्यातच कामाला सुरूवात करण्यामागे नेमके कोणते ‘तत्काल’ कारण होते? दोन महिने थांबून काम सुरू करता येत नव्हते का? असा प्रश्न ग्रामस्थांतून सातत्याने विचारला जात आहे. पाऊस ढगाआड जाण्यापूर्वीच तलावाचे काम सुरू केल्यामुळे या “घाई ?” कडे संशयाने पाहिले जात असून हे काम निवडणूकपूर्व घाईगडबडीत काही निवडक घटकांच्या हितासाठी सुरू केल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.
ही कामे वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत असून या कामासाठी नगरविकास विभागाकडून निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे हे काम शिवसेनेच्या पुढाकाराने होत असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र १० कोटींचा खर्च आणि २४ लाखांचे अनावश्यक ‘तलाव आटवणी’ खर्च या दोन्ही गोष्टींमुळे या कामाची पारदर्शकता आणि आवश्यकताच प्रश्नचिन्हाखाली येत आहे.
नागरिकांच्या मते, “ही लोकसेवा आहे की काही निवडकांसाठीचा फायद्याचा मार्ग?”—हा प्रश्न आता थेट जनचर्चेचा विषय बनला आहे.