जिल्हा परिषद पालघर शाळांतील भरती प्रक्रियेला वेग
रिक्त पदांसाठी ८ जानेवारीला समुपदेशन; यापूर्वी गैरहजर उमेदवारांनाही अंतिम संधी
पालघर, दि. १ जानेवारी २०२६ — जिल्हा परिषद पालघरअंतर्गत प्राथमिक शाळांमधील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी शिक्षण विभागाने भरती प्रक्रियेला गती दिली आहे. मानधन तत्त्वावरील कंत्राटी पद्धतीने निवड झालेल्या उमेदवारांसाठी ८ जानेवारी २०२६ रोजी समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात येणार असून, यापूर्वी गैरहजर राहिलेल्या किंवा जागा न मिळाल्याने नकार दिलेल्या उमेदवारांनाही पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविण्यात येत असून, शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद पालघर यांच्या वतीने समुपदेशन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये दि. ३ एप्रिल २०२५ आणि २९ मे २०२५ रोजी झालेल्या समुपदेशन प्रक्रियेला इयत्ता पहिली ते पाचवी तसेच इयत्ता सहावी ते आठवी (विज्ञान व गणित गट) या पदांसाठी गैरहजर राहिलेले, तसेच रिक्त जागा उपलब्ध नसल्याने किंवा सोयीची जागा न मिळाल्यामुळे नकार दिलेले उमेदवार सहभागी होऊ शकणार आहेत.
सदर समुपदेशन प्रक्रिया दि. ८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता क्रांतिसूर्य बिरसा मुंडा दालन, कक्ष क्रमांक १२२, जिल्हा परिषद पालघर, नवीन प्रशासकीय इमारत, पालघर–बोईसर रोड, कोळगाव, तालुका व जिल्हा पालघर येथे पार पडणार आहे. संबंधित उमेदवारांनी या अंतिम संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर यांनी केले आहे.
दरम्यान, संबंधित उमेदवारांची यादी तसेच सविस्तर प्रसिद्धीपत्रक जिल्हा परिषद पालघरच्या अधिकृत संकेतस्थळावर www.zppalghar.gov.in उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यावर भर देण्यात येत असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने राबविली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.