समर्पित रेल्वे मालवाहतूक मार्ग खुला झाल्याने आता मालगाड्याना स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाला आहे. परिणामी पश्चिम रेल्वेवर प्रवासी वाहतुकीत वाढ होणार आहे. विरार डहाणू भागातील प्रवासी हाल अपेष्टा सहन करून गेली अनेक वर्षे प्रवास करत आहेत. वाढीव सेवांसाठी आवश्यक मार्ग उपलब्ध नसल्याचे उत्तर रेल्वेतर्फे आजवर दिले जाते. या बदललेल्या परिस्थितीत तरी या भागातील रेल्वे प्रवाशांची उपेक्षा थांबणार आहे का यावर चर्चा करणारे नवयुग पालघर ०५ एप्रिलचे हे संपादकीय :
**मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग सुरू:
विरार-डहाणू प्रवाशांची उपेक्षा थांबणार?**
डहाणू ते खारबाव दरम्यान मालगाड्यांना स्वतंत्र समर्पित रेल्वे मालवाहतूक (डीएफसी) मार्गावर वळविण्याचा निर्णायक टप्पा अखेरीस आलाच. हा महत्वपूर्ण टप्पा आहे. पश्चिम रेल्वेच्या मुख्य मार्गावरुन सुरुवातीपासून मार्गक्रमण करणार्या मालगाड्यांना आता आपला स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाला आहे.
या बदलानंतर विरार - डहाणू या भागातील प्रवाशांना गेली अनेक वर्षे “रेल्वे मार्ग उपलब्ध नाही” या कारणावर आधारित असलेले प्रशासनाचे स्पष्टीकरण आता प्रत्यक्षात बाद झाले आहे. त्यामुळे विरार–डहाणू पट्ट्यातील प्रवाशांच्या अपेक्षा स्वाभाविकपणे उंचावल्या आहेत. विरार–डहाणू हा पट्टा आज केवळ भौगोलिकदृष्ट्या उपनगर नाही, तर हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार बनलेला आहे. या भागातील मोठा वर्ग दररोज मुंबईकडे नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी प्रवास करतो. या प्रवाशांसाठी रेल्वे ही केवळ वाहतूक व्यवस्था नाही, तर जीवनवाहिनी बनली आहे.
वास्तव असे आहे की, या मार्गावर लोकल गाड्यांची संख्या अपुरी आहे. गर्दी असह्य पातळीवर पोहोचली आहे. वेळापत्रक अनियमित असून विलंब ही नित्याची बाब झाली आहे. अनेक गाड्या विरारपर्यंतच मर्यादित असल्याने पुढील प्रवाशांची मोठी गैरसोय होते. आजवर रेल्वे प्रशासनाकडून “मार्ग मोकळा नाही” हे कारण देत नवीन सेवा सुरू करण्यात टाळाटाळ झाली. अर्थात हे कारण सयुक्तिक नसल्याचे प्रवासी संघटनांनी अनेकदा निदर्शनास आणून दिले आहे. आता या मार्गावरील मालगाड्यांचा ताण कमी झाला असल्याने रेल्वे मंत्रालय व प्रशासनाला ही सबब यापुढे सांगता येणार नाही.
याहूनही गंभीर बाब म्हणजे, हा भाग अधिकृतपणे उपनगरीय क्षेत्र म्हणून घोषित होऊनही येथे मुंबई उपनगरांप्रमाणे सुविधा उपलब्ध नाहीत. विरारनंतर जणू काही रेल्वे सेवांचा वेग आणि दर्जा दोन्ही कमी होतात, ही भावना प्रवाशांमध्ये खोलवर रुजली आहे.
या भागातील नागरिकांना मुंबई-अहमदाबाद रस्ता मार्ग हा पर्याय म्हणून वापरणे व्यवहार्य नाही. वाहतूक कोंडी, अंतर, खर्च आणि वेळ या सर्व बाबी पाहता, डहाणू–पालघर–बोईसर पट्ट्यातील नागरिकांसाठी रेल्वे हाच एकमेव विश्वासार्ह पर्याय आहे. त्यामुळे रेल्वे सेवांमधील कमतरता ही केवळ गैरसोय नसून, ती आर्थिक आणि सामाजिक मर्यादा निर्माण करणारी ठरते.
समर्पित रेल्वे मालवाहतूक मार्गामुळे औद्योगिक क्षेत्राला त्याचा लाभ होणार, यात शंका नाही. पण विकासाचा हा वेग जर स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा घडवून आणू शकला नाही, तर तो अपूर्णच राहील. आज गरज आहे ती स्पष्ट आणि ठोस कृतीची. विरार–डहाणू दरम्यान लोकल सेवांची तात्काळ वाढ, सर्व गाड्यांचे वेळापत्रक शिस्तबद्ध करणे, लांब पल्ल्याच्या गाड्यांना या मार्गावर थांबे देणे, प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार नियोजन करणे हे निर्णय केवळ तांत्रिक नसून, सामाजिक न्यायाशी संबंधित आहेत, म्हणूनच आवश्यकही आहेत.
शेवटी प्रश्न तोच, मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग झाला, पण प्रवाशांसाठी आवश्यक सेवा आणि प्राधान्य मिळणार का?विरार डहाणू भागातील प्रवाशांची गेल्या अनेक वर्षांची उपेक्षा थांबणार का? रेल्वे मंत्रालय, प्रशासनाबरोबरीने आमच्या लोकप्रतिनिधीनांही याचे उत्तर द्यावे लागेल.