उत्सव सावित्रीचा २०२६ : वक्तृत्वात खुशी कुशवाह तर निबंधात लीना धांडे प्रथम; विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा जागर

Date: 2026-01-08
news-banner
उत्सव सावित्रीचा २०२६ :  वक्तृत्वात खुशी कुशवाह तर
   निबंधात लीना धांडे  प्रथम; विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा जागर

https://youtu.be/YtZXxtdIUnw?si=t1cxNx6F9eJqPuFQ

पालघर सेवा फाउंडेशन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (पालघर) तसेच सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या मराठी विभाग व वक्तृत्व मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘उत्सव सावित्रीचा २०२६’ अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेत खुशी कुशवाह (ज्योतीदीप हिंदी विद्यालय, पास्थळ) हिने प्रथम क्रमांक मिळवून आपली प्रभावी अभिव्यक्ती सिद्ध केली तर निबंध विभागात लीना धांडे (वाय. एन. चाफेकर स्कूल, मनोर) हिने प्रथम क्रमांक पटकावला, शुक्रवार, ३ जानेवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात या स्पर्धा पार पडल्या. 

           पालघर तालुक्यातील १६ शाळांमधील इयत्ता आठवी ते दहावीतील एकूण ५३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत सामाजिक जाणीव, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैचारिक स्पष्टतेचे दर्शन घडवले. स्पर्धांनंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभही उत्साहात पार पडला.

         निबंध स्पर्धेचे परीक्षण प्रा. विद्या पाटील, छबिलदास गायकवाड व ॲड. ऋषिकेश सावंत यांनी केले. विद्यार्थ्यांच्या विचारांची मांडणी, विषयाची समज आणि लेखनातील सुसंगती या निकषांवर परीक्षण करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सीमा महाले  (ADSO) यांनी संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. बक्षीस वितरण समारंभासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आपल्या भाषणात त्यांनी सावित्रीमाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सामाजिक बदलाचे साधन बनवावे, असे आवाहन केले.

यावेळी मराठी विभाग प्रमुख 
 प्रा. विवेक कुडू, प्रा. दर्शना म्हात्रे, पालघर सेवा फाउंडेशनचे उपाध्यक्ष
प्रकाश लवेकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदेश घोलप, सफाळे अंनिस कार्याध्यक्ष स्वाती भोईर, कार्यवाह संजय भोईर, राज्य कार्यकारी समिती सदस्य अण्णा कडलासकर तसेच पत्रकार रमाकांत पाटील यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मन शितल मनिष तामोरे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात गायक, संगीतकार व संगीत विशारद ज्ञानदीप कासले यांच्या सादरीकरणातून शाहीर शीतल साठे लिखित ‘साऊ पेटती मशाल’ या प्रेरणादायी गीताने झाली. या गीताला अन्वी, प्रियांका, विधी व शितल यांनी कोरस दिला. पाहुण्यांची ओळख पालघर सेवा फाउंडेशनचे सचिव राजेश गायकवाड यांनी करून दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन पालघर सेवा फाउंडेशनच्या खजिनदार शितल मेहेर यांनी केले.

वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक निर्भय पाटील व सी.ए. भरत धोंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शालेय अभ्यासासोबतच विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे महत्त्व सांगितले.

मुख्य अतिथी अतिरिक्त जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा महाले  यांनी “तुम्ही सर्व विजेते आहात” असे सांगत स्पर्धांमुळे आत्मविश्वास वाढतो, असे नमूद केले. यूपीएससी–एमपीएससीसारख्या परीक्षांची तयारी इयत्ता आठवीपासूनच सुरू होते, त्यामुळे गुणांपेक्षा सहभाग, सातत्य आणि विचारशक्ती अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

निबंध स्पर्धेचे विजेते

* प्रथम: लीना धांडे – वाय. एन. चाफेकर स्कूल, मनोर
* द्वितीय: दूर्वा पाटील – आनंद आश्रम स्कूल, पालघर
* तृतीय: स्वराज कदम – ह. म. पंडित विद्यालय, सफाळे
* उत्तेजनार्थ: आभा ठाकूर – भुवनेश कीर्तने विद्यालय, माहीम

वक्तृत्व स्पर्धेचे विजेते

* प्रथम: खुशी कुशवाह – ज्योतीदीप हिंदी विद्यालय, पास्थळ
* द्वितीय: निमिती पाटील – लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय, आगरवाडी
* तृतीय: संस्कार मरकड – नवोदय विद्यालय, पालघर
* उत्तेजनार्थ: इशिता पाटील – ग्रामीण विद्या विकास वर्धिनी मंडळ स्कूल, आगरवाडी

Leave Your Comments