डॉ. स. दा. (दादा) वर्तक जीवन गौरव पुरस्कार ‘ग्राममंगल’ संस्थापक रमेश पानसे यांना जाहीर

Date: 2025-12-09
news-banner
डॉ. स. दा. (दादा) वर्तक जीवन गौरव पुरस्कार ‘ग्राममंगल’ संस्थापक रमेश पानसे यांना जाहीर

पालघर : ग्रामीण भागात शिक्षण, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना दरवर्षी प्रदान करण्यात येणारा डॉ. स. दा. (दादा) वर्तक जीवन गौरव पुरस्कार यावर्षी ‘ग्राममंगल’ संस्थेचे संस्थापक व विश्वस्त रमेश पानसे (ऐनागाव, डहाणू) यांना जाहीर करण्यात आला आहे. ही माहिती बोईसर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार वर्तक यांनी दिली.

बोईसर परिसरातील पहिले डॉक्टर व गोरगरीबांचे कैवारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. सदाशिव दा. वर्तक यांची २० डिसेंबर २०२५ रोजी १९ वी पुण्यतिथी असून त्या निमित्ताने हा पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वा. डॉ. स. दा. वर्तक विद्यालयाच्या प्रांगणात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

रु. २५,०००/-, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून, हा पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. यापूर्वी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार प्रदान झाला आहे.

 रमेश पानसे यांनी १९८२ साली ‘ग्राममंगल’ संस्थेची स्थापना करून डहाणू तालुक्यातील आदिवासी भागात बालशिक्षण, शैक्षणिक प्रयोग व पायाभूत सुविधा उभारणी या क्षेत्रात व्यापक काम केले. त्यांच्या कार्यातून राज्यातीलच नव्हे तर देशभरातील बालशैक्षणिक पद्धतींना नवी दिशा मिळाली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निर्धारणातही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

यापूर्वी त्यांना रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो, लातूर भूकंप सेवा पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘गोंदा’ गौरव, सह्याद्री वाहिनीचा ‘शिक्षणरत्न’, गुरुवर्य आबासाहेब अत्रे पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.

Leave Your Comments