नवयुग पालघर
**उदय पाटील अबोल व नेतेगिरी
न करणारा नेता - पालकमंत्री गणेश नाईक **
गाव, तालुका आणि जिल्ह्याच्या सर्वसामान्यांसोबत समरस झालेला, त्यांच्या दु:खातून त्यांना मुक्त करण्यासाठी धडपडणारा, जमिनीवर राहून काम करणारा एक अबोल कार्यकर्ता पुढे नेता झाला. पण त्याने कधीही नेतेगिरी केली नाही अशा शब्दात पालकमंत्री गणेश नाईक यांनी शिवसेनेचे जेष्ठ नेते उदयबंधू पाटील यांच्या कार्याचा गौरव केला.
उदय पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी बविआ सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर, खासदार हेमंत सवरा, माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते राजन विचारे, जिप माजी अध्यक्ष बबन नाईक, प्रकाश निकम, माजी आमदार सुनील भुसारा, माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, उदय पाटील यांच्या पत्नी, मुले, सुना, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना पदाधिकारी कार्यकर्ते, उपस्थित होते. उदय पाटील यांचा स्मृतिचिन्ह,मानपत्र शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कपासे ग्रा.पं.वतीनेही त्यांचा सत्कार झाला.
पालकमंर्त्यांनी आपल्या भाषणात उदय पाटील यांच्या कार्याचा आढावा घेताना, सद्यस्थितीतील राजकीय परिस्थितीवर मार्मिक टिप्पणी करताना अनेक नेत्यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा इतिहास सांगायचा झाला तर जिल्हाप्रमुख म्हणून सर्वप्रथम मनोहर जोशी, सतीश प्रधान, शाबीर शेख नंतर मी आणि माझ्या नंतर आनंद दिघे त्यानंतर बरेच झाले त्यांच्या नावाची मालिका सांगत नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव
घेण्याचे टाळले. तर आज जो ठाणे जिल्ह्याचा इतिहास सांगितला जातो तो खरा इतिहास आहे का? असा सवाल करत, (पुन्हा एकदा शिंदे यांना एकप्रकारे डिवचत),त्यांनी राजन विचारे यांना विचारून श्रोत्यांमध्ये हशा पिकवला.
विनोद पाटील, बापू महाडिक आणि शृंगारपुरे यासारख्या अन्य सर्व नावांशिवाय पालघर तालुक्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही असे सांगताना, बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेल्या या तरुण पिढीने तत्कालीन सत्ताधीशांच्या विरोधात संघर्ष करताना अनेक आंदोलने केल्याच्या आठवणीना उजाळा दिला.शिवसेनेतून राष्ट्रवादी व राष्ट्रवादीतून भाजप असा प्रवास झाला असतानाही चांगल्या ऋणानुबंधामुळे बाळासाहेब ठाकरे व नंतर शरद पवार यांच्याशी अनेकदा विविध विषयावर आपण चर्चा करीत असु असे सांगताना, मी आधी जेथे होतो तेथील लोक वाईट होते आणि आता जिथे आहे तेथील लोक चांगली आहेत असे सांगणार्यातला मी नाही आणि तशी माझी प्रवृत्तीही नाही असे ते म्हणाले. राजकारण हे नेहमी निर्भीडपणे करावं असं मानणार्यातील मी आहे, मी प्रवृत्तीच्या विरोधात आहे. व्यक्तीच्या विरोधात कधीच नव्हतो आणि राहणारही नाही. खोटी बिरुदं मिरवणारी आणि नौटंकी करणार्यांचे मला कधीही आकर्षण नव्हते, असे ते म्हणाले.
१९९० मध्ये आमदार झाल्यानंतर अखंड ठाणे जिल्ह्याचा मी तीनदा पालकमंत्री झालो व आता पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, याबाबत मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मी या कार्यक्रमाला येईल की नाही अशी काही लोकांना शंका होती, परंतु जेथे सात्विकता व सद्भावना आहे अशा प्रत्येक ठिकाणी मी हजर राहतोच असे सांगताना आपल्या एका कार्यकर्त्याच्या एका कार्यक्रमासाठी केवळ दोन तासासाठी इंडोनेशियाला जाऊन आल्याच्या उदाहरणाचा दाखला त्यांनी यावेळी दिला. लोकांचं प्रेम पैशाने, गुंडागिरी किंवा कोणत्याही पदाने मिळत नसून त्यासाठी लोकांना प्रेमच द्यावं लागतं, उदयबंधूच्या बाबतही हेच आढळून येतं, जिल्ह्याच्या सागरी, नागरी आणि डोंगरी भागात कुठेही गेलं, तरी त्यांचा उल्लेख उदय पाटील असा न होता बंधू असेच त्यांना संबोधले जाते. कारण त्यामागे प्रेम आणि जिवंत भावना असतात असे सांगून उदयबंधू यांचे लोकांच्या मनातील स्थान नाईक यांनी अधोरेखित केले.
पक्षांतर करणार्यांवर भाष्य करताना, काही लोक व्यवहारासाठी,काही पदासाठी, काही लपवण्यासाठी तर काही स्वत:ला वाचविण्यासाठी जातात आणि आमचं मन आणि हात स्वच्छ असल्याचे सांगत असतात.असा टोमणाही त्यांनी मारला.
उदय पाटील यांनी कधीच कोणाचा द्वेष न करता नेहमी सकारात्मक राजकारण केलं. जिल्हा परिषद अध्यक्षपदी असताना बबन नाईक यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यालाही उदय पाटील यांनी नकार दिला होता कारण शत्रुत्वही दिलदारपणे जोपासायला हवं असे ते म्हणाले.
बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या उदय पाटील यांना सक्रिय राहण्याचे तसेच धावत पळत जगत राहण्याचे आवाहन केले. कोणत्याही वाहनांची सोय नसलेल्या त्या काळात एसटी किंवा ट्रकचा आधार घेत प्रवास करत गावोगावी शाखा उघडण्याचे काम उदय पाटील व त्यांच्या सहकार्यांनी केल्याची आठवण देत त्यांच्या या कामामुळेच जिल्ह्यात शिवसेनेचा पाया रवला गेल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार हेमंत सावरा यांनी उदय पाटील यांच्याशी माझा प्रत्यक्ष फार संबंध नसला तरी वडील विष्णु सवरा, चिंतामण वनगा यांच्यासोबतच्या बैठकांमध्ये युतीच्या राजकारणाच्या काळात त्यांचे असलेले महत्त्व मी जाणून असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या विचारातूनच त्या काळात युती पुढे जात होती असेही ते म्हणाले.
तर माजी खासदार विनायक राऊत यांनी खोके न स्वीकारणारे नेतृत्व म्हणून उदय पाटील यांचा उल्लेख केला. बाळासाहेबांचा विचार घेऊन ते जिल्ह्यात पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी जि.प.अध्यक्ष बबन नाईक यांनी या कार्यक्रमातील सर्वपक्षीय उपस्थितीने, उदय पाटौल यांच्या राजकारणाची ओळख करुन दिल्याचे सांगून जिल्हा परिषदेतील त्यांच्या कार्यशेलीची वाखाणणा केली.
कुणबी सेना नेते विश्वनाथ पाटील यांनी यावेळी बोलताना उदय पाटील यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला मात्र त्याचबरोबर सध्या आव्हानात्मक व भीतीदायक परिस्थिती असल्याचा उल्लेख करत जमीन/पाणीसाठी सुरू असलेल्या चळवळींना तसेच सध्याची आव्हान स्वीकारण्यासाठी बळ मिळायला हवं अशी सूचना त्यांनी पालकमंत्र्यांना केली.
शिवसेना नेते राजन विचारे यांनीही उदय पाटील यांच्या कामाची प्रशंसा केली. माजी मंत्री मनीषा निमकर यांनी उदय पाटील व त्या काळातील सहकारी कार्यकर्त्यांमुळे सेनेचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचे सांगून, मधल्या काळात आमच्यामध्ये झालेले मतभेद हे राजकीय होते व त्यासाठी मी त्यांची माफी मागितली होती त्यांनी मला माफ केले असेल असे निमकर म्हणाल्या.
शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी उदय पाटील यांच्यामुळेच ठाणे आणि पालघरमध्ये शिवसेना ताकदीने उभे राहिल्याचे सांगितले.त्यांनी कवितेद्वारे त्यांची महती व त्यांच्या बद्दलच्या भावना व्यक्त केल्या. उदय पाटील यांच्यासोबत काम केलेले
विनोद पाटील यांनी पाटील यांचे जिल्ह्यातील स्थान नेमकेपणाने मांडले.
सत्कारमूर्ती उदय पाटील यांच्याकडे शेवटी माईक सोपविण्यात आला.अबोल पाटील काय बोलणार म्हणून उत्सुकता असताना दोन शब्दांत आभार मानून त्यांनी माईक सुपूर्द केला.उदय पाटील यांची सून शुभांगी हरीष पाटील यांनी आभार मानताना सून म्हणून घरात येण्यापूर्वीचा एक किस्सा सांगून कठोर दिसणारे सासरे घरात मात्र सर्वांशी मिळून मिसळून आणि प्रेमाने वागत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जतीन कदम यांनी केले. उदय पाटौल अमृत महोत्सव समितीमार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.