राष्ट्रीय खुल्या रिले स्पर्धेत बिरवाडीच्या रुद्र किणी याने पटकाविले कास्य पदक

Date: 2026-04-08
news-banner
नवयुग पालघर 

**राष्ट्रीय खुल्या रिले स्पर्धेत बिरवाडीच्या रुद्र किणी याने पटकाविले कास्य पदक**

            पालघर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून आलेला तरुण आज महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्रात अभिमानाने झळकतो आहे. चिकाटी, जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर रुद्र गणेश किणी याने राष्ट्रीय पातळीवर दमदार कामगिरी करत संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
         चंदीगड येथील स्पोट्‌र्स कॉम्प्लेक्समध्ये पार पडलेल्या तिसर्‍या नॅशनल ओपन रिले स्पर्धा २०२६ मध्ये महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ४×४०० मीटर रिले शर्यतीत उत्कृष्ट प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले. या संघात पालघर जिल्ह्यातील बिरवाडी गावचा रहिवासी असलेल्या रुद्र किणीचा समावेश होता. महाराष्ट्र संघाने ३:१५:१३ सेकंद अशी वेळ नोंदवत तिसरे स्थान मिळवले. या स्पर्धेत तामिळनाडू संघाने प्रथम, पंजाब संघाने द्वितीय, तर महाराष्ट्राने तृतीय क्रमांक मिळवत आपली छाप उमटवली.
              रुद्र हा सध्या पालघर येथील चाफेकर महाविद्यालयात इयत्ता ११ वीमध्ये शिक्षण घेत असून अभ्यासासोबतच क्रीडाक्षेत्रातही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय अॅथलिट व प्रशिक्षक स्नेहल संजय राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपली कामगिरी अधिक धारदार केली आहे. अॅथलेटिक ग्रुप ऑफ पालघरचा खेळाडू असलेल्या रुद्रने राष्ट्रीय स्तरावरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाचवा क्रमांक मिळवत आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्याच्या या यशामागे त्याचे वडील गणेश किणी (पालघर जिल्हा ग्रंथालय कर्मचारी) व आई गीता किणी यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळेच रुद्रने हे यश संपादन केले आहे.
         रुद्रच्या या यशानंतर बिरवाडी गावात आनंदाचे असून त्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी बिरवाडीचे सरपंच विनोद भावर, उमरोळीचे सरपंच प्रभाकर पाटील, पडघेचे सरपंच अनिल हाडळ, बविआचे प्रशांत पाटील, नगरसेविका राधा पामाळे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी रुद्रच्या कामगिरीचे कौतुक करत त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave Your Comments