जिल्ह्यात जलसंधारण योजनांना वेग, प्रशासनाचा दावा
१३५२ कामे पूर्ण; ‘जलयुक्त शिवार २.०’अंतर्गत २,२६० कामांची यशस्वी अंमलबजावणी
पालघर, दि. ३१ डिसेंबर :
पालघर जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या जलसंधारणाशी संबंधित विविध महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, शासनाच्या सकारात्मक धोरणांमुळे या योजनांना गती मिळत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) रणजित देसाई, उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.) विजया जाधव तसेच जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, जलयुक्त शिवार २.०, लघुसिंचन योजनांची ७ वी प्रगणना व जलसाठ्याची २ री प्रगणना, प्रत्यक्ष स्थळपडताळणी (ग्राउंड ट्रुथिंग), गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार, नाला खोलीकरण व रुंदीकरण तसेच जलशक्ती अभियान ‘कॅच द रेन’ अंतर्गत ‘जल संचय, जन भागीदारी (JSJB) २.०’ या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
१३५२ कामे पूर्ण; गती वाढवण्याचे निर्देश
सदस्य सचिव तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी फरीद खान यांनी योजनानिहाय प्रगतीचा आढावा सादर केला. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, वन विभाग व कृषी विभागामार्फत एकूण १,३५२ कामे पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी उर्वरित कामांना अधिक वेग देण्याचे निर्देश दिले.
जलयुक्त शिवार २.० अंतर्गत २,२६० कामांची पूर्तता
राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार २.० योजनेंतर्गत इतर योजनांतून १,४७१ तर विशेष निधीतून ७८९ अशी एकूण २,२६० कामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. कामांची गुणवत्ता राखून योग्य नियोजनाद्वारे वेळेत कामे पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
प्रगणना व प्रत्यक्ष स्थळपडताळणीला वेग
लघुसिंचन योजनांची ७ वी प्रगणना व जलसाठ्याची २ री प्रगणना अंतर्गत जिल्ह्यातील १,००९ गावांमध्ये प्रगणना सुरू असून, ही कामे मृद व जलसंधारण विभागामार्फत होत आहेत.
तसेच प्रत्यक्ष स्थळपडताळणी योजनेअंतर्गत २८,५३९ कामांपैकी ११,२११ कामांचे मॅपिंग पूर्ण झाले असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
गाळमुक्त धरण व नाला खोलीकरणाचे ठोस परिणाम
गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण योजनेंतर्गत ४ कामे पूर्ण होऊन १६,५२० घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तलासरी तालुक्यातील अनवीर दाभाडेपाडा नाला खोलीकरणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याची कामे पूर्ण करून गाव तलाव व नाल्यांतील पाणीसाठा वाढवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
‘जल संचय, जन भागीदारी’ २.० साठी व्यापक सहभागाचे आवाहन
जलशक्ती मंत्रालयाच्या ‘कॅच द रेन’ मोहिमेअंतर्गत ‘जल संचय, जन भागीदारी (JSJB) २.०’ हा केंद्र व राज्य सरकारांचा संयुक्त उपक्रम असून, त्याचा कालावधी १ जून २०२५ ते ३१ मे २०२६ असा आहे. या उपक्रमांतर्गत पूर्ण झालेल्या जलसंधारण व पर्जन्यजल संचयन कामांची माहिती संबंधित पोर्टलवर वेळेत अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी उपलब्धता वाढवणे तसेच शेतकरी व ग्रामस्थांना दीर्घकालीन लाभ मिळवून देणे हे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून, सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास पालघर जिल्हा जलव्यवस्थापनात आदर्श ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केला.