https://youtu.be/hAw4-jE76ME?si=x5nyNxDoj011JPJD
पालघर नगरपरिषद आरक्षण जाहीर
पालघर नगरपरिषदेच्या १५ प्रभागा अंतर्गत ३० जागांसाठी बुधवार ०८ ऑक्टोबर रोजी आरक्षण जाहीर झाले. उपविभागीय अधिकारी श्याम मदणुरकर यांच्या अध्यक्षतेखाली पालघर नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश जाधव यांच्या उपस्थितीत आरक्षणाची ही सोडत पार पडली.
यानुसार सर्वसाधारण महिलांसाठी ०९, सर्वसाधारणसाठी ०८ , नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी ०४, नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी ०४, अनुसूचित जमाती महिलांसाठी ०२, अनुसूचित जमातीसाठी ०२ तसेच अनुसूचित जातीसाठी एक असे आरक्षण निश्चित झाले आहे.
सर्वप्रथम अनुसूचित जातीचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यास शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी गटनेते कैलास म्हात्रे यांनी हरकत घेतली. आरक्षणाची सोडत २०२५ हे निवडणुकीचे पहिले वर्ष धरून काढण्यात येत असल्याने त्या तरतुदीनुसार चिठ्ठीद्वारा आरक्षण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पिठासीन अधिकाऱ्यांनी त्यांचे हे म्हणणे फेटाळले व अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर केले. तदनंतर अनुसूचित जमातीसाठी ०४ जागा राखीव असल्याचे सांगण्यात आले. त्याप्रमाणे प्रभागनिहाय अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या प्रभागापासून अनुसूचित जमातीचे प्रभाग घोषित करण्यात आले. यामध्ये २ अ मध्ये सर्वाधिक ३०.९२%, प्रभाग ७ अ मध्ये त्या खालोखाल २९.८९ %, प्रभाग ३ अ मध्ये त्या खालोखाल २६.७३ % व १५ अ मध्ये त्या खालोखाल २५.५३% अशी अनुसूचित जमातीची लोकसंख्या असल्याने हे चार प्रभाग अनुसूचित जमाती करता राखीव असल्याचे घोषित करण्यात आले. तदनंतर या ०४ अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागांमधून अनुसूचित जमाती महिलांच्यासाठी चिठ्ठ्या टाकून जागा निश्चित करण्यात आल्या. चिठीद्वारा ७ अ व १५ अ या दोन जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी निश्चित झाल्या.
पुढे नंतर उर्वरित १० जागांमधून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ०८ जागा आरक्षित असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार १० जागांमधून ०८ जागांसाठी चिठ्या काढण्यात आल्या. त्यानुसार ०१ अ, ०५ अ, ०६ अ, ०९ अ, ११ अ, १२ अ, १३ अ व १४ अ या जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निघाल्या. यातून नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी महिलांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यानुसार ०१ अ, ०६ अ , ०९ अ व ११ अ या चार जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित असल्याचे निश्चित झाले व उर्वरित ०५ अ, १२ अ, १३ अ व १४ अ नागरिकांचा मागासप्रवर्ग निश्चित झाले.
पुढे सर्वसाधारण महिला व सर्वसाधारणसाठी विविध प्रभागातून जागा घोषित करण्यात आल्या. यानुसार ०२ ब, ०३ ब, ०४ ब, ०५ ब, ०८ अ, १० अ, १२ ब, १३ ब, १४ ब या जागा सर्वसाधारण महिला व ०१ ब, व ०६ ब ०७ ब, ०८ ब, ०९ ब, १० ब, ११ ब १५ ब या जागा सर्वसाधारण म्हणून निश्चित झाल्या.
खाली विविध गटनिहाय आरक्षणाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार,
सर्वसाधारण : १ ब, ६ ब, ७ ब,८ ब, ९ ब, १० ब, ११ ब,१५ ब (८)
सर्वसाधारण महिला : २ ब, ३ब, ४ ब, ५ ब, ८ अ, १० अ, १२ ब, १३ ब, १४ ब (९)
नामाप्र महिला : १ अ,६ अ,९ अ, ११ अ (४)
नामाप्र : ५ अ,१२ अ, १३ अ, १४ अ (४)
अनुसूचित जाती : ४अ (१)
अनुसूचित जमाती महिला : ७ अ, १५ अ (२)
अनुसूचित जमाती : २ अ, ३ अ (२)