नवीन वर्षात आदिवासी विकासाला नवी दिशा
शिक्षण, कौशल्य आणि रोजगारावर भर – जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड
पालघर, दि. ३१ डिसेंबर :
नवीन वर्षाच्या स्वागतासोबतच पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मितीला प्राधान्य देण्याचा ठाम संदेश जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिला. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत शिक्षणाला सर्वोच्च स्थान देण्याचे आवाहन केले, तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कातकरी समाजासाठी उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय केंद्राला भेट देत विकासाच्या नव्या शक्यता अधोरेखित केल्या.
आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार येथील प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांच्या संकल्पनेतून इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष क्रॅश कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, पळसुंदे (ता. मोखाडा) येथे सुरू असलेल्या या क्रॅश कोर्सला जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या उपक्रमाचा उद्देश आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे तसेच त्यांना व्यावसायिक आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम करणे हा आहे. या क्रॅश कोर्समध्ये दाभेरी, देहरे, विनवळ, न्याहाळे तसेच इतर सहा आश्रमशाळांमधील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील एकूण ३५० विद्यार्थी सहभागी होत आहेत. विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन, सखोल अभ्यास आणि परीक्षाभिमुख तयारीची सुविधा विद्यार्थ्यांना या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घेत सातत्याने अभ्यास करून बारावी परीक्षेत गुणवत्ता वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले. तसेच नीट (NEET) परीक्षेसाठी विशेष कोचिंगची गरज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘सुपर थर्टी’ बॅच सुरू करून स्वतंत्र मार्गदर्शन देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पीएम जनमन योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या खोच (पिंपळपाडा–शिरसोलीचा पाढा) येथील कातकरी बहुउद्देशीय केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सदिच्छा भेट दिली. या केंद्राच्या माध्यमातून कातकरी समाजातील महिला व पुरुषांना स्थानिक पातळीवर रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्यविकास तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या भेटीत त्यांनी स्थानिक महिला व ग्रामस्थांशी थेट संवाद साधत, या केंद्राचा प्रभावी वापर केल्यास समाजाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडू शकतो, असे प्रतिपादन केले. “ग्रामीण व आदिवासी भागात अशा बहुउद्देशीय केंद्रांची साखळी उभी राहिल्यास आदिवासी बांधवांचा आर्थिक कणा मजबूत होईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा देत, शिक्षणातून गुणवत्तावान विद्यार्थी घडवणे आणि कौशल्यविकासाच्या माध्यमातून आदिवासी समाजाला स्वावलंबी बनवणे हाच प्रशासनाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. नवीन वर्षात पालघर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी आणि समाज शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नवे यश संपादन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.