पालकमंत्री जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष देणार की नाही ?

Date: 2025-10-09
news-banner
https://youtu.be/VMEBTJx_OpU?si=6_53wdcIyB2_tEE_

जिल्ह्यात खड्डेमुक्त असा बहुदा एकही रस्ता नसावा..,
या रस्त्यांकडे लक्ष द्यायचे सोडून कोटींच्या  उड्डाणाची नवनवीन रस्त्यांची घोषणा होत आहे... या पार्श्वभूमीवर नवयुग पालघरचे ०५ ऑक्टोबर अंकातील हे संपादकीय..

** पालकमंत्री जिल्ह्यातील रस्त्यांच्या   
 दुरावस्थेकडे लक्ष देणार की नाही ?**

 **जिल्ह्यातील अनेक प्रमुख रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. मनोर - वाडा, वाडा - भिवंडी, मनोर - विक्रमगड, जव्हार - मोखाडा, पुढे इथे पालघर - माहीम - सफाळा, पालघर -मासवण - मनोर-मस्तान नाका आणि प्रमुख जिल्हा मार्ग, गावातील रस्ते यांचीही दयनीय अवस्था झाली आहे. विविध प्रकल्पांमुळे अवजड वाहनांची जी ये-जा होत आहे, त्याच्या परिणामी देखील केळवा रोड - सफाळेसह या परिसरातील अनेक भागात गेली अनेक वर्ष रस्त्यांच्या बाबतीत हीच ओरड आहे.मात्र शासनाला काही जाग येत नाही. 
 शासन आणि प्रशासन जनता दरबार, १००, १५० दिवसांचा कृती कार्यक्रम, सेवा सप्ताह, पंधरवडा -महसूल सप्ताह असे वेगवेगळे सप्ताह साजरे करण्यातच गुंतले आहे. पालकमंत्री गणेश नाईक यांचे याच अनुषंगाने जिल्ह्यात अनेक दौरे झाले आहेत. मात्र रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत ते चकार शब्दहा r बोलत नाहीत. मुंबई अहमदाबाद महामार्गाची अवस्था तर त्यांना आपल्या पालघर दौर्‍याच्या वेळी नियमितपणे दिसते. मध्यंतरी त्यांनी याबाबतीतले अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर या अहवालाचे काय झाले हे त्यांनाच ठाऊक. आता या रस्त्यावर पावसाळा संपल्यानंतर पाणी साचण्याचा प्रश्न उद्‌भवणार नाही. परिणामी रस्त्याचे ठेकेदार बिनधास्त राहतील. मात्र नव्याने हा रस्ता बनला जात असताना या रस्त्यावरील खड्डे आणि त्या अनुषंगाने सुरू असलेले दुरुस्तीचे काम विचारात घेतले तर हा रस्ता नव्यानेच बनवला गेला पाहिजे असे बहुतांशांचे म्हणणे आहे. मात्र त्याकडे कोणी गांभीर्याने पाहत असल्याचे दिसत नाही. जिल्ह्यातील रस्ता दुरुस्ती करता आता मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आणि शासन तो कुठून उपलब्ध करून देणार हा प्रश्नच आहे. 
 पालघर नगरपरिषद तर गणपती, नवरात्र सारख्या सणाच्या कालावधीत देखील आपल्या भागातील रस्त्यांमध्ये सुधारणा करू शकले नाही. धडा हॉस्पिटल ते रिलायन्स मॉल दरम्यानचा रस्ता, न्यायालय ते पुढे लोकमान्य नगर, अल्याळी-बिडको मधील रस्ते, शिवाजी महाराज चौक बोईसर रस्ता, टेंभोडे ते महाविद्यालय रस्ता (ही यादी कितीतरी लांबेल) अशा बहुतांश रस्त्यांची चाळण झाली आहे. नगरविकास विभागातून पालघरला निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र हा निधी पक्ष वाढवण्यासाठी दिला जात असल्याचेच दिसून येते. रस्त्यांच्या सुधारणांसाठी अशा प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला तर नागरिकांचे दररोजचे होणारे हाल तरी वाचतील. मात्र या दृष्टीने कोणी विचार करताना दिसत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे रस्त्यांच्या दुरावस्थेतचा हा अनुभव सर्वच जण घेत असताना, लोकप्रतिनिधीसह सार्‍यांनीच आपले डोळे झाकून घेतल्याचे चित्र दिसत आहे. हा सर्व अनुभव घेतल्यानंतर शासन -प्रशासन आणि लोकप्रतिनिधीं संवेदनाहिन झाले की काय अशी भीती वाटू लागते. किंबहुना तेच आजचे वास्तव आहे. 
 आमचे लोकप्रतिनिधी उत्सवांमध्ये लाखो नव्हे तर कोट्यवधीचा खर्च करत असतात. हा पैसा कुठून आणला जातो हा प्रश्न आम्ही विचारू इच्छित नाही. धार्मिक सण, उत्सव साजरे करण्याला देखील आमचा कोणताही विरोध नाही.यात सर्वांच्याच भावनांचा आम्ही आदर करतो. मात्र त्याचे अवडंबर माजवणे आणि धार्मिक सणाऐवजी त्याला मोठ्या उत्सवाचे स्वरूप देऊन कोट्यावधी रुपये खर्च करून काय साध्य केले जाते हा प्रश्न आहे. या निवडणुकीच्या वर्षात नवरात्री सारखा सण आल्याने देवी दर्शनासाठी आपल्या लोकप्रतिनिधींनी अनुनयाचा जो प्रकार केला तो कितपत योग्य याचाही विचार व्हायला हवा. एक प्रकारे देवी दर्शनाच्या नावाखाली मतदारांना लुभावण्याचा प्रकार होता हे काही लपून राहिले नाही. 
        विशेषत: महाराष्ट्रात मराठवाडा सारख्या भागामध्ये शेतकरी उध्वस्त झालेला असताना आमच्या लोकप्रतिनिधींना या उत्सवावरचा खर्च कमी करावा असे वाटले नाही. अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यातील भात पीकांचेही नुकसान झाले आहे. आम्ही विशेषत: लोकप्रतिनिधी कशाला प्राधान्य देतोय किवा देणार हा प्रश्न आहे.

Leave Your Comments