*अशा होणार पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील लढती :
*बोईसर मतदारसंघ तिरंगी लढत, नुकसान कोणाचे*
*बोईसर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉ. विश्वास वळवी, महायुती शिवसेना पक्षाचे विलास तरे व बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार राजेश पाटील या तिघांमध्ये लढत होणार आहे. २०१९ विधानसभा निवडणूकीत राजेश पाटील यांनी त्यावेळी शिवसेनेत असलेल्या विलास तरे यांचा केवळ २७५२ मतांनी पराभव केला होता. भाजपचे बंडखोर संतोष जनाठे यांना त्यावेळी ३०९५२ (१४.५४टक्के) मते मिळाली होती, तर मनसे उमेदवाराला १४,७८० (६.९४ टक्के) मते व नोटाला ४६२२ (२.१७ टक्के) मते मिळाली होती. अन्य अपक्षांची मते ७८४४ (३.६८ टक्के) होती. तर २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत महायुती भाजपला १ लाख ४हजार ४३९ (४२.०३ टक्के), महाविकास आघाडीला ६२ हजार ७०६ (२५.२३ टक्के), बहुजन विकास आघाडी ६५हजार २९१ (२६.२७ टक्के), बसपा २१५८ (.८६ टक्के) इतकी मते मिळाली होती.
यावेळचे महायुतीचे मताधिक्य ४१७३३ इतके होते. २०१९ नंतर तरे यानी भाजपत प्रवेश केला आणि आता ही जागा शिवसेना शिंदे पक्षाच्या वाट्याला आल्याने तरे यांनी लागलीच पक्षांतर करत शिंदे गटात प्रवेश केला. येथे अन्य तीन उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघातील मतदारांची संख्या ४ लाख ११ हजार ३२९ इतकी असून यामध्ये पुरुष २ लाख २२ हजार २६४ तर महिला १ लाख ८९ हजार ०२२ अशी विभागणी आहे. २०१९ मध्ये या मतदारसंघात २ लाख १३ हजार २३३(६७.६ टक्के) तर २०२४ लोकसभा निवडणूकीत २ लाख ४८ हजार ४५१ (६४.६६ टक्के) इतके मतदान झाले होते.यावेळी तीन प्रमुख पक्षांसह मनसेचे शैलेश भुतकडे,बसपचे अविनाश भावर, व जिजाऊचे नरेश धोडी असे ६ उमेदवार रिंगणात आहेत.
राजेश पाटील हे विद्यमान आमदार असल्याने पाच वर्षात मतदारसंघात रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य अशा विविध स्वरुपाची केलेली कामे त्यांच्या जमेची बाजू आहे. त्याचबरोबरीने मतदारसंघातील मतदारांशी संपर्क,कुणबी सेनेचा पाठिंबा याचाही लाभ त्यांना मिळू शकतो. विलास तरे यांचा भर विशेषत: महायुती सरकारची लाडकी बहिण योजना आणि राज्य सरकारतर्फे झालेली कामे यावर असणार आहे. मधल्या पाच वर्षांच्या काळात ते भाजपात होते.मात्र मतदारसंघ तसेच मतदारांशी त्यांचा फारसा संबंध राहिला नाही. ही त्यांची कमकुवत बाजू ठरु शकते.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विश्वास वळवी यापूर्वी कोणत्याही पक्षात नव्हते.मात्र गेली सुमारे १० ते १५ वर्षे ते पालघर जिल्ह्यात संपर्क ठेवून असून क्रिकेट, कबड्डी सारख्या स्पर्धा, आरोग्य शिबिरे व अन्य उपक्रमांद्वारे ते या मतदारसंघाशी जोडले गेलेले आहेत. या मतदारसंघातील शिवसेना ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस, भूमीसेना,आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना, जनता दल सेक्युलर, तसेच भारत जोडो -निर्भय बनो आदी संघटनांचा त्यांचा लाभ मिळू शकतो. या मतदारसंघातील मुस्लिम व दलित मतेही महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेली असल्याने त्याचाही त्यांना लाभ मिळू शकतो.
लोकसभा निवडणूकीप्रमाणे या निवडणूकीतही बहुजन विकास आघाडी एकाकी लढत आहे.साहजिकच विजयी मतांसाठी राजेश पाटील यांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
या मतदारसंघात जिजाऊचे नरेश धोडी हे देखील रिंगणात उतरले आहेत.ते गेली अनेक वर्ष जिजाऊत सक्रिय असून आरोग्य शिबिरे व अन्य उपक्रम राबवत असतात. साहजिकच जिजाऊ, वरील तीन प्रमुख पक्षांपैंकी कोणाची मते कमी करणार हा प्रश्न आहे.
मागील लोकसभा निवडणूकीत मनसेने महायुतीकडे आपली मते वळवली होती, मात्र या निवडणूकीत मनसे स्वतंत्रपणे लढत आहे. २०१९ च्या निवडणूकीत मनसेने तबब्ल १४ हजार ७८० इतकी मते मिळवली होती. या मतांचा फटका या प्रुख तीन उमेदवारांपैंकी महायुतीलाच (लोकसभा निवडणूकीचा विचार करता) बसणार असे दिसते. अर्थात २०१९ प्रमाणे महायुतीला यावेळी बंडखोरीचे ग्रहण नाही.
या मतदारसंघातील मतदारांची संख्या ४ लाख ११ हजार ३२९ इतकी असून यामध्ये पुरुष २ लाख २२ हजार २६४ तर महिला १ लाख ८९ हजार ०२२ अशी विभागणी आहे. २०१९ मध्ये या मतदारसंघात २ लाख १३ हजार २३३(६७.६ टक्के) तर २०२४ लोकसभा निवडणूकीत २ लाख ४८ हजार ४५१ (६४.६६ टक्के) इतके मतदान झाले होते.