Assembly election अशा होणार जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील लढती :

Date: 2024-11-20
news-banner
*अशा होणार जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील लढती:
*नालासोपारा मतदारसंघ : क्षितिज की क्षितिजा पलीकडे *

ninLWHv.jpeg

uy6xlhS.jpeg

B9SIUeW.jpeg
     
  नालासोपारा विधानसभा मतदारसंघात महायुती भाजपचे राजन नाईक, महाविकास आघाडी काँग्रेसचे संदीप पांडये व बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर अशी तिरंगी लढत होणार आहे. २०१९ च्या निवडणूकीत आमदार क्षितीज ठाकूर हे येथून निवडून आले होते, त्यावेळी भाजप, शिवसेना युतीला  १लाख ६हजार  १३९ (३९.४५ टक्के) तर क्षितीज ठाकूर यांना १ लाख ४९ हजार ८६८ (५५.७टक्के) इतकी मते मिळाली होती. त्यावेळचे बविआचे मताधिक्य ४३हजार ७२९ (१६ .२५ टक्के) इतके होते. मात्र २०२४ च्या निवडणूकीत हे चित्र अनपेक्षितपणे पालटले. यावेळी महायुतीला १ लाख ३६ हजार ८१८ (४६.८७ टक्के) तर बहुजन विकास आघाडीला ७९हजार ४६०(२७.५२टक्के) इतकी मते मिळाली. महायुतीचे त्यावेळचे मताधिक्य ५७ हजार ३५८ (१९.६५टक्के) इतके होते. यावेळी महाविकास आघाडीने तिसर्‍या क्रमांकावर राहत ६६१५० (२२.६६टक्के) इतकी मते मिळवली होती. बविआ व महाविकास आघाडी यातील मतांचे हे अंतर केवळ  १३ हजार ३१०(४.५६ टक्के)  इतकेच होते. बविआने महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर बहुजन विकास आघाडीने महायुती अर्थात भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र यावेळी बविआ एकाकी पडला आहे. बविआ ह्या मतदारसंघातील आपली पुर्वापार मते पुन्हा आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करीत आहे. भाई  ठाकूर देखील ह्या निवडणूकीत त्यासाठीच स्वत: रिंगणात उतरले आहेत. तर हितेंद्र ठाकूरसह त्यांचे सर्व सहकारी प्रयत्नांची शर्थ करीत आहेत. मध्यंतरी बविआचे दोन नंबरचे नेते राजीव पाटील यांनी भाजपकडे आपला कल झुकवला होता.मात्र अखेरीस ते बविआकडेच राहिले आहेत. कुणबी सेनेने येथे बविआला पाठिंबा दिला आहे.मात्र कुणबी सेनेचे या मतदारसंघात फारसे  मतदार नसावेत. पाच वर्षात आमदार म्हणून  केलेली कामे यावर त्यांचा भर राहणार  आहे. त्याचबरोबराने वसई-विरार महानगरपालिके मार्फत प्रभागा-प्रभागात केलेली कामे व तेथील नगरसेवक ही क्षितीज ठाकूर यांची बलस्थाने असणार आहेत. वसईला आणलेले पाणी, एमएमआरडीएमार्फत पायाभूत सुविधांसाठी आणलेला निधी यावरही ठाकूर यांचा भर असेल.
        याऊलट भाजपला या मतदारसंघात बर्‍याच वर्षाने संधी मिळाल्याने ही संधी गमवायची नाही या पध्दतीने ते आपल्या घटकपक्षांसह कामाला लागलेले आहेत. महायुतीची लाडकी बहीण योजना व अन्य योजना, मोदींचा चरिष्मा याचा लाभ उठवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून मिळालेला निधी हा राज्य सरकारने दिलेला निधी असल्याचे सांगून त्याचेही श्रेय घेण्याचा ते प्रयत्न करतील. महाविकास आघाडी काँग्रेसचे संदीप पाडये हे ह्या दोघांशी स्पर्धा करत आहेत. २०१९च्या निवडणूकीत शिवसेनेला मिळालेली मते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ह्यांच्याबरोबरीने काँग्रेसची पुर्वापार मते व मुस्लिम, दलित मतांचा मविआकडे असलेला ओढा यांचा लाभ घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.  
२०२४ लोकसभा आणि यावेळची निवडणूक यात मुलभूत फरक आहे. ही निवडणूक स्थानिक मुद्दे तसेच उमेदवाराचा प्रभाव या भोवती फिरेल..ह्या मतदारसंघात प्रमुख ३ उमेदवारांव्यतिरिक्त मनसेचे विनोद मोरे, बसपचे सुरेश माने, प्रहार जनशक्तीचे धनंजय गावडे, वंचितचे अॅड.सुचित गायकवाड, तसेच रासप व चार अपक्ष मिळून एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत.
नालासोपारा हा समिश्र समाज घटकांमिळून बनलेला मतदारसंघ आहे. उत्तरप्रदेश, बिहार यांच्यासह दाक्षिणात्य मतदारांप्रमाणेच या मतदारसंघात गुजराथी व जैन, मुस्लिम मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. या मतांची विभागणी कशी होते किंवा बहुजन विकास आघाडी नेहमीप्रमाणे आपला पुर्वापार तसेच आपल्या प्रभावाखालील मतदार आणण्यात यशस्वी होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. लोकसभा निवडणूकीत या मतदारसंघातील मुस्लिम, दलित मतदार महाविकास आघाडीकडे झुकला होता असे दिसते.यावेळी काँग्रेस उमेदवाराला त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. उत्तर भारतीयांसाठी योगींचा वापर भाजप करणार असला तरी अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी व लालूप्रसाद यादव यांचे पक्षामार्फत ह्या मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न मविआ काँग्रेस उमेदवार करणार असेही चित्र आहे. मविआचे उमेदवार स्वत: उत्तर भारतीय असल्याने त्याचाही लाभ उठविण्याचा पांड्ये यांचा प्रयत्न असेल.
          २०१९ मध्ये या मतदारसंघात २ लाख ६९ हजार ६८ (५१.८३ टक्के) तर २०२४ लोकसभा निवडणुकीत २ लाख ९१ हजार ८७५ (५२.३४ टक्के) इतके मतदान झाले होते.तब्बल ५०७ मतदान केंद्र असलेल्या या मतदारसंघाची मतदार संख्या जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ६ लाख ८ हजार ५२६ इतकी आहे. यामध्ये पुरुष ३ लाख ३६ हजार ५२२ तर महिला मतदार २ लाख ८१ हजार ८८४ इतक्या आहेत.

Leave Your Comments