जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात अशा होणार लढती :

Date: 2024-11-20
news-banner
*जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात अशा होणार लढती :
प्रकाश निकम बंडखोरी-भुसारा यांना लाभ ?*
xTv9nIR.jpeg
8uQzSqM.jpeg

ozgXbYT.jpeg
   *विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील तिरंगी लढत आता रंगतदार बनत चालली आहे.महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विद्यमान आमदार सुनील भुसारा,महायुती भाजपाचे हरिश्चंद्र भोये व शिवसेना शिंदे पक्षाचे बंडखोर उमेदवार जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम असा हा तिरंगी सामना आहे. प्रकाश निकम यांच्या बंडखोरीमुळे भाजप उमेदवाराचे गणित बिघडणार हे महायुती भाजपच्या लक्षात आले असावे. यातूनच त्यांनी निकम यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा आग्रह धरला व त्याप्रमाणे कारवाई झाली आणि या कारवाईनंतर निकम यांच्या सोबत असलेले काही पदाधिकारी युतीच्या प्रचाराची सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.मात्र त्यानंतरही प्रकाश निकम यांच्या पायाचा रथ थांबलेला नाही.मोखाडासह जव्हार, विक्रमगड,वाडा हा सर्व परिसर ते आपल्या जुन्या सहकार्‍यांसह पिंजून काढत आहेत मोखाडा पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष या कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा आधार आणि मतदारांशी असलेल्या थेट संपर्क यांच्या माध्यमातून आपण विजयी होऊ असा त्यांना विश्वास आहे.तर महायुती भाजपचे हरिश्चंद्र भोये हे लाडकी बहीण योजनेसह महाराष्ट्रात महायुती सरकारने केलेल्या कामेंची शिदोरी आपल्या सोबत घेऊन गावपाड्यांमध्ये प्रचार फेरी आणि भेटीद्वारे मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. खासदार हेमंत सवरा हे अलीकडेच खासदार बनल्याने निवडणुकीच्या प्रचारामध्ये सावरा हे त्यांचे बलस्थान राहिले आहे. पंतप्रधान मोदींचा करिष्मा, देवेंद्र फडणवीस यांनी मतदाराने केलेली हाक तसेच भाजपची युवा, महिला अशा विविध संघटनात्मक पातळीवर झालेली बांधणी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचे त्यांनी केलेले काम हा भोये यांचा आधार असून यातून मतदार आपल्यावर  विश्वास टाकतील असा त्यांना विश्वास आहे. विद्यमान आमदार सुनील भुसारा यांच्यासमोर  या दोघांचे आव्हान आहे. आमदार म्हणून पाच वर्षे काम करत असताना काही प्रमाणात नाराजी असणे साहजिक आहे .मात्र प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात ही नाराजी संपवण्याचे काम भुसारा यांनी केल्याचे दिसते. गेल्या पाच वर्षात रस्ते, आरोग्य, पाणी, शिक्षण, आश्रम शाळा, अंगणवाडी अशा विविध विकास कामांचा लेखाजोखा ते मतदारांसमोर ठेवत आहेत व राहिलेली कामे येत्या पाच वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन देत आहेत. विधानसभेत मतदारसंघातील समस्यांसाठीचा आवाज नेहमीच बुलंद केल्याचे ते अभिमानाने सांगतात. केवळ मतदार संघातील प्रश्नच नव्हे तर राजकीय पातळीवरील लढाईत देखील ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये जाऊन बसले आहेत. शरद पवार यांच्यासह जयंत पाटील व पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांचा त्यांना कायमच आशीर्वाद राहिलेला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे या मतदारसंघातील कार्य तसेच काँग्रेसचे मतदारसंघातील मतदार व कष्टकरी संघटनेसह अन्य संघटनांचा त्यांना मिळालेल्या पाठिंबा ही त्यांची जमेची बाजू आहे.
        प्रकाश निकम यांच्यामुळे महायुतीच्या मतांची विभागणी होईल असा त्यांचा अंदाज आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भुसारा यांना ८८ हजार ४२५ (४८.३६) तर हेमंत सवरा यांना ६७ हजार २६ (३६.६६) इतकी मते मिळाली होती.या दोघांमधील मतांचे अंतर २१ हजार ३९९इतके होते. त्यावेळी ८४९५ (४.६५) मतदारांनी नोटाला पसंती दिली होती तर रिव्होल्युशनरी मार्क्सवादी पक्षाने ४०३२ ( २.२१),भारतीय कम्युनिस्ट पक्ष ३८८२ (२.१२), वंचित बहुजन आघाडी १७५१(०.९६) अशी मते मिळवली होती. तर    
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला ०१ लाख ०६ हजार ५३(४७.१७)व महाविकास आघाडीला ७२ हजार ८४४( ३२.४०) तसेच बहुजन विकास आघाडीला २२ हजार ७०(०९.८१)इतकी मते मिळाली होती.याच बरोबरीने वंचितने ५१९१ तर नोटाकडे ५५२० मते वळली होती. लोकसभा निवडणुकीतील महायुती व मविआ यांच्या मतातील अंतर  ३३ हजार २०९ इतके होते. मात्र यावेळी बहुजन विकास आघाडीने भुसारा यांना पाठिंबा दिल्याने बविआची मते त्यांच्या पारड्यात पडू शकतील. या तीन प्रमुख उमेदवारा व्यतिरिक्त या मतदारसंघात अन्य आठ उमेदवार रिंगणात आहेत.
            २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात एक लाख ८२ हजार ५३१ (६८.५१) तर २०२४ लोकसभा निवडणुकीत ०२ लाख २४ हजार ८१५ (७४.४५टक्के) इतके मतदान झाले होते. ३५८ मतदान केंद्र असलेल्या या मतदारसंघात तीन लाख १७ हजार ७४१ मतदार असून पुरुष मतदारांची संख्या एक लाख ५८ हजार १८८ तर महिला मतदारांची संख्या एक लाख ५९ हजार ५५२ इतकी आहे.

Leave Your Comments