विक्रमगड मतदारसंघ : भाजपकडून पुन्हा ताब्यात
विक्रमगड विधानसभा मतदारसंघात महायुती प्रणित भाजप उमेदवार हरिश्चंद्र भोये यांनी त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी प्रणित राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार सुनील भुसारा यांचा ४१ हजार ४०८ मतांनी पराभव केला. भोये यांना ०१ लाख १४ हजार ५१४( ४६.०२ टक्के) तर भुसारा यांना ७३ हजार १०६(२९.३८टक्के) इतकी मते मिळाली. शिवसेना शिंदे पक्षातून बंडखोरी केलेले जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम तिसर्या क्रमांकावर राहिले. त्यांना ३२ हजार ५६८ (१३.०९ टक्के) इतकी मते मिळाली. अपक्ष उमेदवार आकाश शिंदे यांनी ६ हजार ५६१ ( २.६४ टक्के) इतकी मते घेतली तर मनसेचे सचिन शिंगडा यांनी ४ हजार ६१९( १.८६ टक्के)अन्य अपक्ष उमेदवार भालचंद्र मोरघा यांनी ५ हजार ६० ( २.०३ टक्के) व भारतीय ट्रायबल पार्टीचे मोहन गुहे यांनी २ हजार ४९५( ०१.००)टक्का इतकी मते मिळवली.नोटाला येथे ४ हजार ५८५ ( १.८४टक्के इतक्या मतदारांनी पसंती दिली.
भाजप उमेदवार हरिश्चंद्र भोये यांच्या मताचा टक्का लोकसभा उमेदवार हेमंत सवरा यांच्यापेक्षा ०१.१५ टक्क्यांनी कमी झाला असून प्रकाश निकम यांच्या मताचा फटका त्यांना या टक्केवारी घटीत बसलेला दिसतो. याउलट लोकसभेत मविआ उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा भुसारा यांना ०३.०२ टक्के मते कमी मिळाली आहेत. तर २०१९ विधानसभेच्या तुलनेत तब्बल १८.९८ टक्के इतकी मते कमी मिळाली आहेत.
याउलट २०१९ च्या तुलनेत भाजपाने आपल्या मताचा टक्का ०९.३६ टक्क्यांनी वाढवला आहे. बंडखोर उमेदवार प्रकाश निकम यांनी भाजप उमेदवार तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार या दोघांनाही फटका दिल्याचे मताच्या आकडेवारीवरून दिसते. मतमोजणीच्या एकूण २७ फेर्यांपैकी एक फेरी वगळता, भोये यांना २६ फेर्यांमध्ये मताधिक्य मिळाले असून भुसारा यांना केवळ पहिल्या फेरीमध्येच मताधिक्य मिळाले आहे. तर निकम यांना एकाही फेरीमध्ये मताधिक्य मिळाले नाही.