डोलीवर मृतदेह; रस्त्याअभावी ग्रामस्थांचा आक्रोश

Date: 2025-09-19
news-banner
https://youtu.be/Xjds_pF8DAw?si=MSI58-l0vQZDlfew

डोलीवर मृतदेह; रस्त्याअभावी ग्रामस्थांचा आक्रोश

जव्हार, ता. 18 :
मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग, बुलेट ट्रेन, वाढवण अहमदाबाद महामार्गाला जोडणार,  तेथून पुढे नाशिक- समृद्धीला , काही दिवसांनी विमाने उडणार, विरार अलिबाग कॉरिडॉर देखील मार्गस्थ होतोय आणि शेजारी जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यात काय चित्र आहे ? विकासाच्या गाजावाजाच्या काळातही पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी पाडे अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्त्याच्या अभावामुळे आजही रुग्ण व मृतदेह डोलीवर वाहून न्यावे लागतात, ही वस्तुस्थिती जव्हार तालुक्यातील चांभारशेत-पैकी नारनोली येथे उघडकीस आली आहे.

गावातील महेंद्र लक्ष्मण जाधव यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह रुग्णालयातून मुख्य रस्त्यापर्यंत तर पोचला. पण गावापर्यंत पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मृतदेह डोलीत टाकून पाड्यात नेण्याची वेळ आली. या घटनेने गावकऱ्यांचा संताप ओसंडून वाहू लागला.

“जिवंत असो वा मृत – दोन्ही अवस्थेत आम्हाला अजूनही डोलीवरच जावं लागतं. आमच्या जिवनमरणाशी असा खेळ किती दिवस सुरू राहणार?” असा सवाल ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश जाधव यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, “आदिवासी विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च होतात, पण पाड्यांपर्यंत रस्तेच पोहोचत नाहीत.”

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, शासन दरबारी अनेकदा मागणी करूनही आजतागायत रस्ता उपलब्ध झालेला नाही. “हा सुवर्ण महाराष्ट्र? स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही आमच्या खांद्यावर मृतदेहाची डोली असावी लागते. हाच का विकासाचा चेहरा?” असा जळजळीत प्रश्न गावकऱ्यांनी विचारला आहे.

Leave Your Comments