सफाळे पश्चिम भागाला दिलासा : महावितरणच्या रामबाग उपकेंद्रात नवीन फीडर कार्यान्वित
Date: 2025-09-19
नवयुग पालघर Navyug Palghar Weekly
https://youtu.be/k7bjFh08Tik?si=Ok5qbf1oHksnj-L-
सफाळे पश्चिम भागाला दिलासा : महावितरणच्या रामबाग उपकेंद्रात नवीन फीडर कार्यान्वित
सफाळे, ता. १८ सप्टेंबर :
सफाळे परिसरातील नागरिकांना अखेर दिलासा मिळाला असून महावितरणच्या रामबाग उपकेंद्रात नवीन फीडर कार्यान्वित करण्यात आला आहे. या फीडरमुळे जुन्या फीडरवरील भार कमी होऊन सफाळे पश्चिम विभागाला पुरवठा होणाऱ्या विजेच्या विद्युत दाबात सुधारणा होणार आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ सफाळे महावितरणचे उप अभियंता बैतूले यांच्या प्रमुख उपस्थितीत, वेढी–मांजुर्ली गावचे सरपंच नचिकेत पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. महावितरणचे नवीन फीडर आणि उपकेंद्र स्थापनेसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल सरपंच पाटील यांना हा मान मिळाला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते लायन भूपेश म्हात्रे, माजी उपसरपंच आशिष राऊत, ग्रामपंचायत सदस्य अनिल किणी आदी मान्यवर उपस्थित होते.
“नवीन फीडरमुळे जुन्या फीडरवरील विद्युत भार कमी होईल. यामुळे विद्युत दाब वाढून ग्राहकांना दिलासा मिळेल. तसेच लवकरच वेढी येथे नवीन उपकेंद्र उभारण्याचे काम सुरू होईल,” अशी माहिती उप अभियंता बैतूले यांनी दिली.