“युवकांनी विज्ञानाकडे केवळ विषय म्हणून नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीच्या शक्ती म्हणून पाहावे,” असे प्रेरणादायी प्रतिपादन भारतीय अंतराळ संशोधन संघटना (ISRO) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. पी. व्यास यांनी केले.

Date: 2026-02-18
news-banner
नवयुग पालघर :  विक्रम साराभाई अवकाश प्रदर्शन २०२६

“युवकांनी विज्ञानाकडे केवळ विषय म्हणून नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीच्या शक्ती म्हणून पाहावे,” असे प्रेरणादायी प्रतिपादन भारतीय अंतराळ संशोधन संघटना  (ISRO) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. पी. व्यास यांनी केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विक्रम साराभाई अवकाश प्रदर्शन २०२६ चे भव्य उद्घाटन १७ फेब्रुवारी रोजी सेंट जॉन टेक्निकल अँड एज्युकेशनल कॅम्पस येथे उत्साहपूर्ण व शैक्षणिक वातावरणात संपन्न झाले. १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित या तीन दिवसीय प्रदर्शनाचा पहिला दिवस उद्घाटन समारंभानेच दिमाखात सुरू झाला.
उद्घाटन समारंभाची सुरुवात कॅम्पस गीताने झाली. अध्यक्षांच्या ध्वनिमुद्रित संदेशात युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, नवोपक्रमाची जाणीव आणि संशोधनाभिमुख वृत्ती विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
ISRO च्या १२ सदस्यीय पथकाने प्रदर्शनात सहभाग नोंदवला. भारताच्या अवकाश संशोधनातील ऐतिहासिक कामगिरी, विविध उपग्रह मोहिमा, रॉकेट्सची मॉडेल्स, ‘स्पेस ऑन व्हील्स’ उपक्रम तसेच प्रत्यक्ष वैज्ञानिक प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञानाचा थरार अनुभवता आला.
सन्मानित मान्यवरांमध्ये डॉ. धनी राम राजक (गट संचालक, SAC-ISRO), डॉ. एस. पी. व्यास (वरिष्ठ शास्त्रज्ञ), दिशा दवे (वरिष्ठ विज्ञान संवादक),  राहुल भाडणे (वरिष्ठ विज्ञान संवादक),  अमित माळी (विज्ञान संवादक),  प्रणव पंड्या (विज्ञान संवादक),  रौनक वांकर (प्रदर्शन व्यवस्थापक),  रुद्राक्ष मकवाणा (प्रदर्शन व्यवस्थापक),  गोहिल हितेंद्रसिंह डी. (‘स्पेस ऑन व्हील्स’ तंत्रज्ञ चालक) आणि  सहोता धर्मेंद्र (तंत्रज्ञ/चालक) यांचा समावेश होता.

स्वागतपर भाषणात डॉ. सविता तौरो यांनी पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक प्रदर्शन भरविणे ही अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले. डॉ. कमल शाह यांनी सेंट जॉन कॅम्पसचे शैक्षणिक उपक्रम, संशोधनाधिष्ठित दृष्टीकोन तसेच भारताच्या वाढत्या अवकाश मोहिमांचा सविस्तर आढावा समोर ठेवला.
आपल्या विस्तृत मार्गदर्शनपर भाषणात डॉ. एस. पी. व्यास यांनी भारताच्या अवकाश कार्यक्रमाचा इतिहास उलगडताना महान शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या दूरदृष्टी आणि स्वप्नांचा विशेष उल्लेख केला. विक्रम साराभाई यांनी मांडलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोनामुळे भारताने अवकाश संशोधनात केलेली प्रगती कशी शक्य झाली, याचे त्यांनी सखोल विश्लेषण केले. त्यानंतर त्यांनी अवकाश विज्ञानातील वाढ, संशोधन, तांत्रिक प्रगती आणि भारताने गाठलेली आंतरराष्ट्रीय पातळीवरील यशस्वी झेप याविषयी माहिती दिली.
भविष्यातील अवकाश मोहिमा, तंत्रज्ञानातील उन्नती, उपग्रह संप्रेषण, अवकाश अनुप्रयोग आणि संशोधनाच्या नव्या संधी यावरही त्यांनी प्रकाश टाकला. विशेषतः Space Application Centre (SAC) मध्ये इंटर्नशिपच्या संधी, संशोधन प्रकल्पांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आणि अवकाश क्षेत्रात करिअर घडविण्याच्या विविध मार्गांविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. “भविष्यात पालघरमधूनही एखादा विद्यार्थी अवकाश शास्त्रज्ञ म्हणून पुढे येईल, याचा मला अभिमान वाटेल,” असे ते म्हणाले. राजस्थानमधील एका साध्या पार्श्वभूमीतून, सरकारी अनुदानित शाळेत शिक्षण घेत, नम्रता, जिद्द, एकाग्रता आणि शिस्त यांच्या जोरावर आपण शास्त्रज्ञ पदापर्यंत पोचल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. ध्येय ठरवून प्रामाणिक प्रयत्न केल्यास कोणतीही पार्श्वभूमी अडथळा ठरत नाही, असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला.
जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात वैज्ञानिक जाणीव वाढविण्यासाठी संस्थेच्या प्रयत्नांचे कौतुक केले. जिल्ह्यातील विविध शाळांच्या सहभागाचा आढावा  अशोक मेटी यांनी घेतला.
उद्घाटनाच्या दिवशी तब्बल ३० शाळांमधील सुमारे ३००० विद्यार्थी शिक्षकांसह उपस्थित होते. याशिवाय अनेक जिज्ञासू नागरिकांनीही आवर्जून भेट देत प्रदर्शनाचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांचा आणि शैक्षणिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अधोरेखित करण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता हिरल पटेल यांच्या आभार प्रदर्शनाने झाली, तर सूत्रसंचालन जोसलिन यासियस आणि रोमेरो डी यांनी  केले. त्यानंतर प्रदर्शन दालनात फित कापून प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. सेंट जॉनचे प्राध्यापक व विद्यार्थी तसेच सेंट जॉन इंटरनॅशनल स्कुलचे विद्यार्थी, विविध शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, शैक्षणिक प्रशासक आणि स्थानिक शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान सुरू असलेले हे अवकाश प्रदर्शन पालघर जिल्ह्यासाठी एक मैलाचा दगड ठरत असून गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधनाभिमुखता आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

***ही प्रदर्शनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे मुख्य केंद्र असलेल्या स्पेस अँप्लिकेशन सेंटर  अहमदाबाद , यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत असून विद्यार्थ्यांमध्ये तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञानाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे “अंतराळ तुमच्या दारी” हा फिरता अंतराळ प्रदर्शन उपक्रम होय. या विशेष बसद्वारे भारताच्या विविध अंतराळ मोहिमा, उपग्रह तंत्रज्ञान आणि प्रक्षेपण वाहने यासंबंधी माहितीपर नमुने, चित्रफलक, माहितीफिती आणि दृक्-श्राव्य सादरीकरणे दाखविण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना अंतराळ विज्ञानाचा प्रत्यक्ष, संवादात्मक आणि अनुभवाधारित परिचय मिळणार आहे.
प्रदर्शनामध्ये उपग्रह तंत्रज्ञान, अंतराळ मोहिमा, प्रक्षेपण यंत्रणा आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित विविध शैक्षणिक व संवादात्मक मांडणी करण्यात येणार आहे. अभ्यागतांना अंतराळ विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना, उपग्रहांची कार्यपद्धती तसेच प्रक्षेपण वाहनांची भूमिका समजून घेण्याची संधी मिळेल. भारताने अंतराळ संशोधन क्षेत्रात साधलेली उल्लेखनीय प्रगती सोप्या आणि आकर्षक पद्धतीने सादर करण्यात येणार असून ती विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांना तसेच सर्वसामान्य जनतेला समजेल अशा स्वरूपात असेल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश पूर्णतः विनामूल्य आहे.***

Leave Your Comments